फुकट्या प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
वर्धा,
ticketless passengers मध्य रेल्वेने सुरक्षित सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री करण्याच्या कटिबद्धतेनुसार आपल्या संपूर्ण नेटवर्कवर अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत केलेली वाढ आणि तिकीट तपासणीच्या तीव्र मोहिमा यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात २ हजार ६२९ फुकट्या प्रवाशाकडून १७ लाख १८ हजार ३७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
 
ticketless passengers
 
मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात अवैध प्रवास करणार्‍या २ हजार ६२० प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून १७ लाख १८ हजार ३७५ रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७ हजार २५७ प्रवाशांकडून ५१ लाख २८ हजार ६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. २०२५-२६ मध्ये ४ हजार २९७ प्रवाशांकडून २४ लाख ६९ हजार ३८५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावरही परिणाम होतो. हा महसूल प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी वापरला जातो.
 
 
प्रवाशांना वैध तिकीटशिवाय प्रवास करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि तिकीट नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विनातिकीट प्रवासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवला आहे. या बदलानंतर, मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर तिकीट तपासणीची मोहीम अधित तीव्र केली आहे. यासाठी स्थानकांवरील तपासणी, अचानक तपासणी, स्थानकाच्या प्रवेश व निर्गम मार्गावर केली जाणारी तपासणी, सखोल तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम, अशा विविध पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
 
 
गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट काढून सन्माने आणि जबाबदारीने प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना करत आहे. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे धोरण कठोर आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सन्मानजनक असावा, यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे.