अनिल कांबळे
नागपूर,
appointment case दीर्घकाळ रखडलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या निधनानंतर तब्बल ३५ वर्षांनी त्याच्या मुलीचे नाव अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश मॅटने राज्य शासन व पोलिस प्रशासनाला दिलेत. या निर्णयामुळे अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बुलढाणा जिल्ह्या पोलिस दलात चालक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी मारोतराव नागरे यांचे २३ ऑक्टोबर १९९१ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी भारती नागरे यांनी २८ नोव्हेंबर १९९१ रोजी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचे नाव बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही त्यांना नोकरी देण्यात आली नाही. दरम्यान, वय ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यानंतर, त्यांची मुलगी वैशाली नागरे यांनी २००७ व २०१० मध्ये आईच्या जागी स्वत:चे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला. परंतु बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वडिलांच्या निधनानंतर १९ वर्षांनी अर्ज केला आहे, असे सांगून तो नाकारला होता. याविरोधात भारती नागरे व वैशाली नागरे यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती.
मॅटचे निरीक्षण व निर्णय
प्रकरणाची सुनावणी प्रशासकीय सदस्य नितीन गद्रे यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान अर्जदारांचे वकील अॅड. राजू कडू यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या पूर्णपीठाच्या निर्णयाचा दाखला दिला. यानुसार ४५ वर्षे वय ओलांडल्यामुळे नाव वगळले गेल्यास कुटुंबातील दुसऱ्या घटकाचे नाव समाविष्ट करता येते. मॅटने नमूद केले की, अर्जदारांनी १९९१ मध्येच वेळेत अर्ज केला होता. परंतु प्रशासनाच्या विलंबामुळे त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे या विलंबासाठी अर्जदारांना जबाबदार धरता येणार नाही.
मॅटचे मुख्य आदेश
पोलिस प्रशासनाने पुढील तीन महिन्यांच्या आत वैशाली नागरे यांचे नाव अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावे. वैशाली नागरे यांची प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठता ही त्यांची आई (भारती नागरे) वयाची ४५ वर्षे पूर्ण करून अपात्र ठरल्याच्या तारखेपासून धरण्यात यावी. वैशाली नागरे यांच्यातर्फे अॅड. राजू कडू यांनी बाजू मांडली.