अनिल कांबळे
नागपूर,
gadchiroli greenfield airport गडचिरोली जिल्ह्यातील बहूचर्चित (ग्रीन फील्ड) विमानतळ धावपट्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. ही धावपट्टी आता पूलखल ऐवजी गडचिरोलीजवळील सहा गावांच्या परिसरातील ३११.८१ हेक्टर जमिनीवर प्रस्तावित आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्राव्दारे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दिली. याचिकेचा उददेश सफल झाल्यामुळे न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांनी याचिका निकाली काढली.
ग्रीन फील्ड विमानतळ धावपट्टी बांधण्याकरिता पूलखलसह इतर गावातील लगत जमिनी प्रस्तावित धाव पट्टी बांधण्याकरिता भूसंपादन करण्याचा जिल्हा शासनाच्यावतीने हालचाली मागील काही वषार्पूर्वी सुरु झाल्या होत्या. मात्र प्रस्तावित विमानतळ गाव भारतीय संविधानाच्या पाचवा अनुसूचित क्षेत्रात मोडत असल्यामुळे पेसा ग्राम पंचायतचा ग्राम सभा काढून कोणत्याही प्रकारच्या पेसा नियम २०१४ प्रमाणे मंजूर किंवा नामंजूर ठराव व सहमती न घेता प्रस्तावित भूसंपादनाविरोधात पूलखलच्या सरपंच सावित्री तुकाराम गेडाम यांनी अॅड. श्रावण ताराम यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सावित्री गेडाम यांनी याचिकेत मुद्दे उपस्थित केले होते की , धावपट्टी बांधण्यासाठी प्रस्तावित गावे भारतीय संविधानाच्या पाचवा अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे त्या गावातील भूसंपादन करण्यापूर्वी ग्राम पंचायतच्या ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर किंवा नामंजूर करण्याची तरतूद मुंबई ग्राम पंचायत अधिनियम, पंचायत विस्तार ( अनुसूचित क्षेत्र) अधिनियम कायदा १९९६ आणि पेसा नियम २०१४ मध्ये नमूद आहे. परंतु अशी कुठलीही ग्राम सभा शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे धावपट्टी बांधण्यासाठी भूसंपादन अवैध ठरते. प्रस्तावित विमानतळ गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला योगदान देणारे ठरणार आहे. मात्र या विमानतळाकरिता प्रस्तावित ठिकाण हे पूलखल गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या कोटगल बॅरेज, कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील सुपीक जमिनीचे असून याच शेतजमिनींवर गावातील शेतकºयांची उपजीविका अवलंबून आहे. पूलखल गावाच्या हद्दीतील तलाव, बोड्या व झुडपी जंगलाची काही जमीन यात समाविष्ट असल्याने गावातील उर्वरित शेत जमिनीचे व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट होणार होते. gadchiroli greenfield airport गडचिरोली - चंद्रपूर या महामागार्ला जोडणारा पूलखल गावाचा मुख्य रस्ताही कायमचा बंद होणार होता. गावाचे पारंपरिक देवस्थान एक बोटी माऊली व इतर श्रद्धास्थाने ही नष्ट होणार होते. तसेच मुरखळा गावाच्या हद्दीतून पूलखल-मुडझा गावाच्या सीमेवरून असलेल्या नाल्याला वैनगंगा नदीच्या पुराच्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या निर्माण होण्यास नाकारता येत नाही. विमानतळामुळे नाला बुजविल्या असल्याने पूलखल - मुडझा रस्त्याला व शेतीला पुराचा मोठा फटका बसणार होता. त्यामुळे विमानतळासाठी पूलखल गावाच्या हद्दीवर शेतजमिनी, तलाव, जिल्हा परिषद शाळा, झुडपी जंगल, नाला व इतर जमीन संपादित करणे हे पूलखल गावातील शेतकरी व इतर नागरिकांवर भविष्यातील उपासमारी आणनारे, शेत जमिनींचे क्षेत्र कमी करणारे, जमिनीच्या मालकी हक्क आणि गावाच्या सामूहिक मालमत्तांच्या मालकी हक्क हिरवणारे ठरणार असल्याचे म्हटले आहे.
अनेक भविष्यात उद्भवल्या जाणाऱ्या समस्यामुळे गावातील शेतकऱ्यांना विमानतळाचा तिटकारा होता. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात धावपट्टी रद्द करण्यासाठी याचिका दाखल करून विरोध केला होता. अखेर गडचिरोली जिल्हाधिकारी आणि उप विभागीय अधिकारी यांनी हायकोर्टात शपथपत्र दाखल करून अनुसूचित क्षेत्रातील ग्राम पंचायतच्या विरोध दर्शविल्यामुळे व ग्राम पंचायतची सहमती नसल्यामुळे प्रस्तावित भूसंपादना करण्याच्या प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. शपथपत्राच्या अहवालानुसार ग्राम पंचायतीमार्फत दाखल केलेल्या याचिकेचा उद्देश सफल झाल्यामुळे याचिका कोर्टाने निकाली काढली. सरपंच सावित्री गेडाम यांच्यातर्फे अॅड. श्रावण ताराम यांनी बाजू मांडली.