मुंबई कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
मुंबई
accident मुंबईतील कोस्टल रोडवर पहाटेच्या सुमारास भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. लाला कॉलेजसमोरील लोटस जेटीजवळ पहाटे सुमारे ५.२० वाजता हा अपघात झाला. मरीन ड्राईव्हहून हाजी अलीच्या दिशेने जाणाऱ्या कोस्टल रोडवरून जात असलेली DD01-C-6302 क्रमांकाची BMW कार पुलावरून थेट खाली कोसळली.
 

accident 3 dead, 1 injured after car crashes near lotus jetty 
प्राथमिक माहितीनुसार, कारने कोस्टल रोडच्या बाजूचा दुभाजक आणि विद्युत वाहिनीचा पोल यांना जोरदार धडक दिली. या अपघातात धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनिया (१९) आणि शनय गजर (२१) यांचा मृत्यू झाला. आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातग्रस्त BMW ही दादरा आणि नगर हवेली-दमण-दीव येथील नोंदणीची असल्याचे समोर आले आहे. ही गाडी फाल्गुन गजर यांच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांपैकी गजर यांच्या नातेवाईकांची ही कार असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या दुर्घटनेतील मृत आणि जखमी तरुण मूळचे अहमदाबादचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिक्षणासाठी ते मुंबईतील जुहू आणि कुर्ला परिसरात राहत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी कल्पेश्वर ओसवाल याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास ताडदेव पोलीस करत आहेत. ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी BMW चा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा अधिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिवेगामुळे चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कारचा भीषण अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.