समुद्रपूर,
bridge-inaugurationसाकुर्ली गावात धाम नदीवरील ४ कोटी ३६ लाख निधीतून निर्माण पुलाचे लोकार्पण आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुयातील साकुर्ली येथील धाम नदीवर पुल नसल्याने या मार्गावरील अनेक गावांतील नागरिकांना नदीतून जाणे येणे करावे लागत असल्याने गावकर्यांनी आमदार कुणावार यांच्याकडे समस्या मांडली. त्यांनी पुलासाठी सततचा पाठपुरावा करून ४ कोटी ३६ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला. आता पुलाचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सोयीसाठी मोकळा करण्यात आला.
लोकार्पण प्रसंगी आ. कुणावार म्हणाले, बावापूर ते साकुर्ली रस्त्यावरील साकुर्ली गावात धाम नदीवरील ४ कोटी ३६ लाख निधीतून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे साकुर्ली, सावंगी, सजातपूर व परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या पुलाचे काम सुरू झाले तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी या अर्धवट पुलाचे फोटो व्हिडिओ व्हायरल करुन जनतेत संभ्रम निर्माण करणार्याचा प्रयत्न केला.
मात्र आपले एकच ध्येय होते की पुलाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे. अनेक वर्षांपासून परिसरातील जाण्या येण्याची समस्या दूर करणे आज या पुलाचे काम होऊन लोकार्पण झाले असून आपण दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे आ. कुणावार म्हणाले. यावेळी साकुर्ली, सावंगी, सजातपूर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.