हिमनदी वाचवण्यासाठी ढगांवर ‘उपचार’

कृत्रिम हिमवृष्टीचा प्रयोग चर्चेत

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
बीजिंग,
Experiment with artificial snowfall चीन आणि कझाकिस्तानच्या सीमेवरील सावीर पर्वतरांगांमध्ये असलेल्या मुज ताव हिमनदीचे वितळणे कमी करण्यासाठी वैज्ञानिकांनी २०१८ मध्ये अनोखा प्रयोग केला. ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाइडचा वापर करून कृत्रिम हिमवृष्टी घडवून आणण्यात आली. या प्रयोगानंतर हिमनदीवरील बर्फाचा ऱ्हास १४ ते १७ टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधनातून समोर आले. मात्र, हा प्रयोग अल्प कालावधीसाठी आणि प्राथमिक स्वरूपात करण्यात आल्याने त्याचा दीर्घकालीन परिणाम निश्चित करण्यासाठी आणखी प्रयोगांची गरज असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.सावीर पर्वतरांगांमधील हिमनद्या १९५९ पासून सातत्याने मागे सरकत आहेत आणि अलीकडच्या काळात बर्फ वितळण्याचा वेग वाढल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुज ताव हिमनदीवर १९ ते २२ ऑगस्ट २०१८ दरम्यान दोन वेळा कृत्रिम हिमवृष्टीचे प्रयोग करण्यात आले. यासाठी नदीच्या परिसरात सौरऊर्जेवर चालणारी आणि दूरस्थपणे नियंत्रित करता येणारी १४ सिल्व्हर आयोडाइड धूरनिर्मिती यंत्रे बसवण्यात आली होती. हवामान रडारच्या मदतीने योग्य ढग ओळखल्यानंतर ही यंत्रे सुरू करण्यात आली. सिल्व्हर आयोडाइडचे कण ढगांमध्ये बर्फाच्या केंद्रकांच्या निर्मितीस मदत करतात. त्यातून ढगांमधील जलवाष्पाचे बर्फात रूपांतर होऊन हिमवृष्टी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
 
snofakka
 
या प्रयोगामुळे हिमनदीच्या पृष्ठभागावर नव्या बर्फाचा थर तयार झाला आणि त्याची परावर्तित करण्याची क्षमता म्हणजेच अल्बेडो वाढले. पांढऱ्या बर्फाचा पृष्ठभाग सूर्यकिरणांचा अधिक भाग परत परावर्तित करतो, त्यामुळे सौरऊर्जेचे शोषण कमी होते आणि बर्फ वितळण्यासाठी उपलब्ध ऊर्जा घटते. प्रयोगापूर्वी १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत हिमनदीचा वस्तुमान समतोल उणे ६१.४ मिलीमीटर जलसमतुल्य होता, तर प्रयोगानंतर १८ ते २४ ऑगस्टदरम्यान तो उणे ३७.२ मिलीमीटर जलसमतुल्य नोंदवण्यात आला. या दोन कालावधींची तुलना करता बर्फाचा ऱ्हास सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. संशोधनाच्या विश्लेषणानुसार कृत्रिम हिमवृष्टीमुळे हिमनदीचा एकूण वस्तुमान ऱ्हास १४ ते १७ टक्क्यांनी कमी झाला.मुज ताव हिमनदीची लांबी २०१६ च्या मोजणीनुसार ३.२ किलोमीटर असून तिचे क्षेत्रफळ ३.१३ चौरस किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासून तिची उंची ३,१३७ ते ३,८१८ मीटरपर्यंत आहे. हिमनदीवरील बदलांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी विविध ठिकाणी अल्बेडो आणि वस्तुमान समतोलाची नोंद केली. काही उंच भागांमध्ये अल्बेडो ०.८ पर्यंत आढळले, म्हणजे तेथील बर्फ सूर्यप्रकाशाचा मोठा भाग परत परावर्तित करत होता.
 
 
 
जिमुनाई हवामान केंद्रावर वापरण्यात आलेल्या हवामान रडारच्या मदतीने सावीर पर्वतरांगांतील ढगांची दिशा, उंची आणि अंतर निश्चित करण्यात आले. योग्य वातावरणीय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर धूरनिर्मिती यंत्रे सुरू केली जात आणि दरीतील वारे सिल्व्हर आयोडाइडचे कण हिमनदीच्या दिशेने घेऊन जात. या प्रयोगात बाहेरून अतिरिक्त पाणी वापरून पाऊस पाडण्यात आलेला नव्हता. नैसर्गिक हिमवृष्टीचा परिणामही काही प्रमाणात झाल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले असून, हिमवृष्टीत नैसर्गिक पर्जन्याचा वाटा २१ टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आले. वैज्ञानिकांच्या मते, कृत्रिम हिमवृष्टीमुळे हिमनदीच्या पृष्ठभागावर बर्फाचे प्रमाण वाढते आणि अल्बेडो वाढल्याने सूर्याची ऊर्जा कमी प्रमाणात शोषली जाते. त्यामुळे अल्प कालावधीत बर्फ वितळण्याचा वेग कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, हा केवळ प्राथमिक प्रयोग असल्याने मोठ्या क्षेत्रावर आणि दीर्घ कालावधीसाठी असे प्रयोग केल्यानंतरच या पद्धतीची परिणामकारकता निश्चित करता येईल, असे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.