‘हाफ मर्डर’ झाल्याची थाप मोठी; पोलिसांची धावपळ, माहिती निघाली खोटी

- हुडकेश्वर पोलिसांकडून खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
police माझ्या भावाने मला मारहाण केली असून, माझा हाफ मर्डर केला आहे. मला हुडकेश्वर पोलिसांची मदत हवी,’ असा फोन पोलिस नियंत्रण कक्षाच्या डायल ११२ क्रमांकावर आला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी लगेच एक पथक घटनास्थळावर पाठवले. मात्र, घटनास्थळावर असा कोणताही प्रकार आढळून आला नाही. पोलिस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्याम भाऊराव जाणोरकर (४०, रा. श्रीकृष्णनगर) असे आरोपीचे नाव आहे.
 

 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्याम जाणोरकर याने १८ सप्टेंबर रात्री आठ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. ‘माझ्या भावाने मला मारहाण केली असून, माझा हाफ मर्डर केला आहे. मला हुडकेश्वर पोलिसांची मदत हवी आहे,’ अशी माहिती त्याने ११२ क्रमांकावर दिली. गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तत्काळ दखल घेत हुडकेश्वर पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचले. मात्र, तेथे जाणोरकर याने सांगितल्याप्रमाणे मारहाणीचा किंवा जीवघेण्या हल्ल्याचा कोणताही प्रकार घडल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी माहितीची पडताळणी केली असता, ११२ वर केलेला कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस नियंत्रण कक्षाला चुकीची किंवा खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्ची घातल्याप्रकरणी हुडकेश्वरच्या ठाणेदार अनामिका मिर्झा यांनी कारवाई केली. श्याम जाणोरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती देणे गंभीर बाब असून, अशा कॉलमुळे प्रत्यक्षात मदतीची गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत पोलिस पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे आपत्कालीन सेवांचा गैरवापर न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.