तळेगाव (श्या.पंत),
antora आष्टी तालुयातील अंतोरा येथे ७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते शनिवार १९ रोजी झाले. यावेळी खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आष्टीचे नगराध्यक्ष अनिल धोत्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, येथे नव्याने बांधण्यात आलेली इमारत परिसरातील गावांसाठी एक उत्तम आरोग्य केंद्र ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यत केला. सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयातील उपचार परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्येच उत्तम सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना आणली. या योजनेतून ५ लाखांपर्यंतचे सर्व उपचार, शस्त्रक्रिया मोफत होतात. रुग्णांना नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये देखील उपचारांसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
देशात सध्या एलनिनोचे संकट आहे. पुढे देखील पावसाचा खंड व जमिनीतील पाण्याची पातळी खालावण्याची शयता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पृष्ठभूमीवर राज्यस्तरावरुन उपाययोजना करत आहे. आपण जिल्हास्तरावर उपाययोजना सुरू केल्या. शेतकर्यांनी देखील पीकनिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी खंबीरपणे एलनिनोमुळे आपल्या पुढे असलेल्या संकटाचा सामना करावा, राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे ते म्हणाले.
अंतोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसरातील गावांना चांगला फायदा होणार आहे. हे केंद्र अधिक उत्तमपणे कसे कार्यरत होईल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी रुग्णांना वरच्या रुग्णालयात रेफर केले जातात, असे होऊ नये, असे खा. अमर काळे म्हणाले.
आरोग्य सुविधा उभारण्याच्या भर : आ. वानखेडे
अनेक अडचणींचा सामना करत अंतोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत प्रवेश होत आहे. याठिकाणी चांगली आरोग्य सेवा आता घडली पाहिजे. आर्वी मतदारसंघात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणाचे काम आपण हाती घेतले आहे. पुढील वर्षापर्यंत मतदारसंघातील सर्व केंद्रांचे नुतनीकरण पूर्ण होईल. आरोग्य केंद्रातील रिक्त पदे पुढील वर्षापर्यंत भरली जातील. आष्टीचा आकांक्षित तालुका म्हणून समावेश झाल्याने प्रत्येक वर्षी अतिरिक्त ५ कोटींचा निधी तालुयाला मिळणार असल्याचे आ. सुमित वानखेडे म्हणाले.