केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

५,०५३ पानी दोषारोपपत्र दाखल

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
पुणे
ketan agrawal पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना दोषारोपपत्रातून या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लोणावळा पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सिया, चेतन आणि रितेश हांगे या तिघांना आरोपी करण्यात आले असून, हत्येपूर्वी केतनला अपंग करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे.
 

ketan agrawal murder case: 5,053-page chargesheet reveals alleged plot and lohagad plan 
पोलिसांच्या तपासानुसार, सुरुवातीला तिघांनी केतनला स्वतः न मारता परराज्यातील व्यक्तीच्या माध्यमातून गंभीर दुखापत करण्याचा कट आखला होता. यासाठी त्यांनी अनेक व्यक्तींशी संपर्क साधल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, बाहेरील व्यक्तीला या कटात सहभागी केल्यास भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते, अशी भीती निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. संपर्कातील एका व्यक्तीने या प्रकरणात पोलिसांना माहिती देत साक्षीदार होण्याची भूमिका घेतल्याचेही दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
यानंतर केतनची हत्या आपणच करण्याचे तिघांनी ठरवले. हत्येची पद्धत ठरवण्यासाठी संबंधित विषयावरील चित्रपट पाहण्यात आले आणि चॅटजीपीटीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या काळात मेघालयातील सोनम प्रकरणाचाही अभ्यास केल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे.
हत्येसाठी योग्य ठिकाण शोधताना तिघांनी लोणावळा परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. २९ मे रोजी किंवा मे महिन्याच्या अखेरीस सिया आणि चेतन यांनी टायगर पॉईंटची रेकी केली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय लोणावळ्यातील अनेक डोंगर आणि संभाव्य ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली.
अखेर लोहगडाची निवड करण्यात आली. मार्च २०२५ मध्ये लोहगडावर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे केतनचा सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत पडून मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करता येईल, असा विचार करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
केतनच्या हत्येपूर्वी सियाने ४ जून रोजी लोहगडावर जाण्याचा हट्ट केला होता. तिला बालीला जाण्यापूर्वीच केतनची हत्या करायची होती, अशी माहिती दोषारोपपत्रात नमूद आहे. ६ जून रोजी प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्याचे नियोजन होते. मात्र, त्यापूर्वी खालापूर येथील एका कॅफेच्या वॉशरूममध्ये सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकल्याचे तपासात आढळले. त्यामुळे त्यांचा बालीचा प्रवास होऊ शकला नाही.
यानंतर १४ जून रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले. त्यावेळी सियाने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र तो दरीत पडला नाही. त्यानंतर साप आल्याचा बनाव करून केतनला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रयत्नातही यश आले नाही.
त्यानंतर हत्या घडवून आणण्यासाठी तिघांनी सोशल मीडियाचा वापर करून नवा डाव आखल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यांनी ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. १८ जून रोजी या खात्यावरून सियाची मैत्रीण असल्याचे भासवत केतनशी संपर्क करण्यात आला. सियाचा वाढदिवस लोहगडावर साजरा करण्यासाठी तिला तेथे घेऊन येण्यास केतनला सांगण्यात आले. हा संपूर्ण डाव रितेश हांगे याने आखल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
ठरलेल्या योजनेनुसार चेतन दुसऱ्या मार्गाने लोहगडावर पोहोचला आणि गडावरील मंदिरात जाऊन बसला. त्यानंतर सियाने केतनला वर जाण्यास सांगितले. केतनचे लक्ष नसताना सियाने मागून त्याच्या खांद्याला धक्का दिला. त्यानंतर चेतननेही त्याच्या पायाला धक्का दिला. अखेरीस चेतनने लाथ मारल्यानंतर केतन खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा दावा आहे.
या संपूर्ण प्रकरणात तिघांनी आधीपासून कट रचून केतनला अपंग करण्यापासून ते अखेरीस त्याची हत्या करण्यापर्यंत अनेक प्रयत्न केल्याचे दोषारोपपत्रातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून ५,०५३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून, आता या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.