वर्धा,
journalist rajesh madavi पत्रकार, लेखक राजेश मडावी लिखित व स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘शताब्दीची साक्ष : वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता’ या ग्रंथाचे प्रकाशन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. शीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमंत माने प्रमुख अतिथी व भाष्यकार म्हणून उपस्थित होते. यशवंतराव दाते स्मृती संस्था व वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी १९ रोजी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमाला यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे प्रदीप दाते, विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक अविनाश पोईनकर उपस्थित होते.

वर्धा-सेवाग्राम परिसरातील पत्रकारितेला गांधी-विनोबांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. ‘शताब्दीची साक्ष : वर्धासेवाग्रामची पत्रकारिता’ हा ग्रंथ पत्रकारिता व संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. गांधी विनोबांच्या भूमीतील पत्रकारितेत देशाच्या प्रेरणेचे बळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. वर्धा-सेवाग्रामच्या भूमीतील १८८६ ते १९८६ या शंभर वर्षांतील गांधी, विनोबा, सत्यशोधक आणि आंबेडकरी विचारांच्या पत्रकारितेच्या विविध प्रवाहांचा सखोल मागोवा घेत या इतिहासाचे जतन ग्रंथातून झाले आहे, असे मत पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७५ पुस्तकं विकत घेत असल्याचेही जाहीर केले.
ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमंत माने यांनी ‘शताब्दीची साक्ष : वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता’ हे पुस्तक केवळ गांधी-विनोबा आणि वर्धा-सेवाग्रामच्या इतिहासापुरते मर्यादित नाही तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या व्यापक इतिहासाचे वर्धा-सेवाग्रामशी असलेले अतूट नाते प्रभावीपणे अधोरेखित करते. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या कार्याचे स्थानिक पातळीवर उमटलेले पडसाद, त्या काळातील सामाजिक परिस्थिती तसेच जैन समाजाने मराठी साहित्याच्या विकासासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान यांचे मौलिक दस्तऐवजीकरण हे या पुस्तकाचे लक्षणीय वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला विदर्भातील साहित्य, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती.
महाराष्ट्रातील पत्रकारितेचे पहिले वर्धा गॅझेट
महाराष्ट्रात जिल्हास्तरीय पत्रकारितेचा सलग आणि अभ्यासपूर्ण मागोवा घेणारा ग्रंथ आजवर उपलब्ध नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी घट्ट जोडलेल्या वर्धा, पवनार-सेवाग्रामच्या भूमीतून प्रकाशित होणारा ‘शताब्दीची साक्ष : वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता (१८८६१९८६)’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील पत्रकारितेचे पहिले वर्धा जिल्हा गॅझेट ठरले आहे.