मुंबई
devendra fadnavis राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या राजकीय प्रवासासह विरोधकांशी असलेले संबंध, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांबाबत भूमिका स्पष्ट केली. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा सामना करताना आपण कासवासारखी भूमिका घेत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचे उदाहरण दिले.
“माझी प्रेरणा कासव आहे. माझी स्पीड कासवाची नाही; मात्र प्रेरणा कासवाची आहे. धोका आला किंवा कुणी दगड मारला की कासव कवचात जाते आणि पुन्हा बाहेर येते,” असे फडणवीस यांनी सांगितले. दिवसभर भेटणारे नागरिक, राज्यात उद्योग सुरू करणारे उद्योजक तसेच पत्नी आणि मुलगी हे आपल्याला सातत्याने काम करण्यासाठी ऊर्जा देतात, असेही त्यांनी नमूद केले.
नागपूरमधील सामाजिक संबंधांचा संदर्भ देताना फडणवीस म्हणाले की, नागपूरमध्ये घराचा पत्ता सांगताना अनेकदा ‘कोण कोणाच्या घराजवळ राहतो’ याचा आधार घेतला जातो. मुख्यमंत्री झाल्यानंतरही आपले अनेक मित्र आपल्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, असे त्यांनी सांगितले. “हे बरोबर नाही,” अशा स्पष्ट शब्दांत आपल्याला सांगणारे अनेक लोक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.मोठ्या पदावर गेल्यानंतर अनेक जण स्वतःबद्दलची टीका किंवा चुकीच्या गोष्टी ऐकून घेण्याची तयारी ठेवत नाहीत. मात्र, आपण अशा प्रत्येक गोष्टी ऐकण्यास तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आपल्या हातून झालेल्या चुका किंवा चुकीच्या गोष्टीही लोकांनी निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या कामकाजाबाबत devendra fadnavis बोलताना फडणवीस यांनी सहयोगी पक्षांच्या सहकार्याचा उल्लेख केला. एखादे काम पूर्ण मनापासून हाती घेतले तर सहयोगी पक्ष मदतीला येतात, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महायुतीतील सहयोगी पक्षांनी आपल्याला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.समृद्धी महामार्गाच्या उभारणीदरम्यान झालेल्या राजकीय विरोधाचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. उद्धव ठाकरे यांनीही त्यावेळी विरोध केला होता, जरी ते त्या काळात महायुतीचा भाग होते, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, आपण आपल्या ध्येयावर ठाम राहून काम सुरू ठेवले. एका वर्षात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगत, सुरुवातीला प्रकल्पावर टीका करणारे लोक आज त्याचे कौतुक करत असल्याचा दावा त्यांनी केला. “सगळ्या विरोधकांचे तोंड बंद झाले,” असेही फडणवीस म्हणाले.
मुंबईतील आगामी पायाभूत सुविधांच्या कामांबाबतही त्यांनी भूमिका मांडली. वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या समांतर आणखी एक रस्ता तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे-बोरीवलीदरम्यान नवा मार्ग आणि भुयारी मार्ग उभारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय बुलेट ट्रेन आणि मुंबई विमानतळ यांना जोडण्याच्या दृष्टीनेही काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी करणे हे या प्रकल्पांमागील उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबईत कोणत्याही ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुमारे ४५ मिनिटांत पोहोचता यावे, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईच्या विस्ताराच्या दृष्टीने ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुलाखतीत नमूद केले.