मंगरूळनाथ,
mangrulnath मंगरूळनाथ येथील डॉ. नवलकिशोर आसावा यांची कन्या सिमरन आसावा हिने विज्ञान आणि विशेषतः विज्ञान संवाद या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये पीएच.डी. संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या सिमरनने प्रतिष्ठित फॅमेलॅब स्पर्धेत स्वित्झर्लंडची राष्ट्रीय विजेती होण्याचा मान मिळवला असून, आता ती डिसेंबरमध्ये पोलंड येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशामुळे मंगरूळनाथ तालुयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सिमरन आसावा हिचे प्राथमिक शिक्षण मंगरूळनाथ नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत झाले. त्यानंतर तिने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कारंजा लाड येथील जे. सी. हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने नागपूर येथे घेतले. पुढे एनआयटी वरंगल येथून बी.टेक. पदवी संपादन केली. त्यानंतर जर्मनीमध्ये एम.एस.चे शिक्षण पूर्ण करून स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे पीएच.डी. कॅन्सर संशोधनाचा प्रवास सुरू केला. आज सिमरन स्वित्झर्लंडमध्ये पीएच.डी. संशोधक म्हणून कार्यरत असून, प्रोफेसर निकोला असेटो यांच्या संशोधन गटाशी संबंधित आहे.
फॅमेलॅब ही विज्ञान संवादासाठी जगभरात ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात २००५ मध्ये ब्रिटनमधील चेल्टनहॅम सायन्स फेस्टिव्हल येथे झाली. विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सामान्य नागरिकांना केवळ तीन मिनिटांत सोप्या, प्रभावी आणि रंजक पद्धतीने समजावून सांगणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. आता डिसेंबरमध्ये पोलंड येथे होणार्या फॅमेलॅब आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे तिच्या पुढील आंतरराष्ट्रीय कामगिरीकडे मंगरूळनाथ वासीयांचे लक्ष लागले आहे. मंगरूळनाथ नगर परिषद शाळेच्या वर्गखोल्यांमधून शिक्षणाची सुरुवात करणारी सिमरन आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विज्ञानाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा हा प्रवास ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.