कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून तरुणाचा मृत्यू!

कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
मुंबई,
mumbai ganesh visarjanमुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह आणि धामधूम सुरू असतानाच, मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराचा अत्यंत निष्काळजी आणि ढिसाळ कारभार समोर आला आहे. जोगेश्वरी पूर्वेतील श्याम नगर तलावाजवळील कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जन करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून रोहित भीमसिंग राठोड या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आईचे छत्र आधीच हरपलेल्या या तरुणाच्या अचानक जाण्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जोगेश्वरी परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

pond 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या जवळील श्याम नगर तलाव परिसरातील पालिकेच्या कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. रोहित राठोड हा १९ वर्षीय तरुण तिथे विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन सुरू असतानाच कृत्रिम तलावातील पाण्यात किंवा तेथील विजेच्या यंत्रणेत अचानक वीज उतरली. पाण्यात उतरलेल्या या विद्युत प्रवाहामुळे रोहितला विजेचा भीषण शॉक लागला आणि तो गंभीररीत्या होरपळला. उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ शेजारीच असलेल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
 
रोहित हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे आधीच निधन झाले होते. आता तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि घराचा आधार बनू पाहणाऱ्या एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. रुग्णालयाच्या परिसरात वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.