नागपूर,
Nagpur Newsनागपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षक भरती प्रक्रिया अधिक व्यवस्थित, प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.
शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी दीपक लाढ्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला शिक्षणाधिकारी अमित भदाने, डॉ. मेघना वासनकर, उपशिक्षण विभागाचे अधिकारी तसेच उपशिक्षण अधिकारी सुभाष उपासे यांच्यासह मनपाच्या प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
बैठकीत शिक्षणाधिकारी अमित भदाने यांनी शिक्षक भरती प्रक्रियेबाबत मुख्याध्यापकांना सविस्तर माहिती दिली. शाळा समितीच्या माध्यमातून शिक्षक भरती कशा पद्धतीने करावी, भरती प्रक्रियेतील विविध टप्पे, आवश्यक कागदपत्रे, संबंधित नियम तसेच प्रक्रिया राबविताना घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. मेघना वासनकर आणि उपशिक्षण अधिकारी सुभाष उपासे यांनीही मुख्याध्यापकांना आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापकांच्या विविध प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले.
मनपाच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळांची वास्तविक गरज लक्षात घेऊन आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रियेला गती देणे हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता. संबंधित प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.
यावेळी शिक्षण सभापती संतोषदेवी दीपक लाढ्ढा म्हणाल्या की, मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुरेशा संख्येने शिक्षक उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अधिकारी आणि मुख्याध्यापकांच्या समन्वयातून शिक्षक भरती प्रक्रिया पुढे नेण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे.
शिक्षक हा केवळ वर्गात अध्यापन करणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे मनपाच्या शाळांमध्ये आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.