विखे-पाटील घराण्याचा राजकीय प्रवास सातासमुद्रापार!

नीला यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Neela's entry into the Swedish Parliament महाराष्ट्रातील विखे-पाटील कुटुंबाच्या राजकीय आणि सामाजिक वारशाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. नामांकित शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या खासदारपदी निवड झाली आहे. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या स्वीडनच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून ४१ वर्षीय नीला यांनी विजय मिळवला. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे महसूल व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
 
nila
 
 
प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नीला यांच्या निवडीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्या सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. स्वीडनच्या पंतप्रधानांच्या राजकीय सल्लागार म्हणूनही त्यांनी यापूर्वी जबाबदारी पार पाडली आहे. नीलाकडून आपल्याला मोठ्या अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वीडन आणि महाराष्ट्रातील राजकीय कार्यपद्धतीत मोठा फरक असल्याचे सांगत, सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात व्यक्तीद्वेषाचे वातावरण असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. नीला विखे पाटील यांचा संबंध विखे-पाटील कुटुंबाच्या सहकार क्षेत्रातील मोठ्या वारशाशी आहे. आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती असून, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत.
 
 
आता स्वीडनच्या २४९ सदस्यांच्या ‘रिक्सडॅग’मध्ये त्या खासदार म्हणून काम करणार आहेत. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला यांनी आपल्या बालपणाचा काही काळ अहमदनगरमध्ये घालवला. त्यानंतर त्यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्यासह पदवी तसेच एमबीएचे शिक्षण घेतले. माद्रिद येथील युनिव्हर्सिटी डी कॉम्प्ल्युटेन्समधूनही त्यांनी एमबीए पदवी मिळवली आहे. स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात वित्त, कर आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी सल्लागार म्हणून काम केले. त्या स्टॉकहोम नगर परिषदेच्या सदस्यही होत्या. गेल्या १५ वर्षांपासून त्या पर्यावरणवादी विचारसरणीच्या ‘ग्रीन पार्टी’मध्ये सक्रिय आहेत. जागतिक दर्जाच्या ‘प्राइसवॉटरहाऊसकूपर्स’ संस्थेत सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्वीडनच्या यंदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ‘ग्रीन पार्टी’सह विरोधी आघाडीने १७६ जागा जिंकून बहुमत मिळवले असून, त्यात नीला विखे पाटील यांच्या विजयाचीही नोंद झाली आहे.