पाकिस्तानची लष्करी कारवाई; आठ दहशतवादी ठार

खैबर पख्तूनख्वामधील मशिदीवरील हल्ल्याचा सूड

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
इस्लामाबाद, 
pakistan-army-and-terroristsपाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील कोहाट येथे लष्कर आणि इसिसमध्ये २० तास चाललेल्या चकमकीत आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी कोहाट येथील पोलिस वसाहतीतील मशिदीवर आत्मघाती हल्ला केला होता. यात ३१ जणांचा मृत्यू झाला, त्यात १६ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता, तर १०० पेक्षा जास्त जखमी झाले. हल्लेखोरांना ठार करण्यात यश आल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे.
 

pak 
कोहाट मशिदीवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी याच भागात लपून होते आणि सुरक्षा दलाच्या जवानांचे अपहरण करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या भागात सैन्याचे विशेष कमांडो मोहीमेसाठी पाठवण्यात आले. सुरक्षा दलांनी अपहरणाचा डाव हाणून पाडत इसिसच्या आठ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने निवेदनातून दिली.
 
 
खंडणीसाठी अपहरण करणे, पैसे उकळणे आणि वाहने हिसकावून घेणे या उद्देशाने दहशतवाद्यांनी एक बनावट तपासणी नाका उभारला होता. दहशतवाद्यांनी कलातजवळ चमन-कराची एन-२५ महामार्गावर वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा दल तेथे पोहोचले. यावेळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून सहा ट्रक, तीन बस आणि दोन कारसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली.
 
 
डोंगराळ भागात शोधमोहीम सुरू
डोंगराळ भागात लपलेल्या उर्वरित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलाची मोहीम सुरू आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वासह अनेक भागांमध्ये पाकिस्तानी लष्कर मोहीम राबवत आहे. इसिस, टीटीपी आणि बीएलए आमचे लक्ष्य असून, या कारवाईसाठी वायुदलाची मदत घेतली जात आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले.
 
 
आठ महिन्यांत ९९० दहशतवादी हल्ले
पाकिस्तानमध्ये यावर्षी दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट ॲण्ड सिक्युरिटी स्टडीज’ने (पीआयसीएसएस) जारी केलेल्या अहवालात म्हटले की, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान संपूर्ण पाकिस्तानमध्ये ९९० दहशतवादी हल्ले नोंदवले गेले. यात ११२६ लोकांचा मृत्यू झाला. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १९९, तर जुलैमध्ये १४४ हल्ले नोंदवले गेले. एका महिन्यात दहशतवादी हल्ल्यात ३८ टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये या हल्ल्यांमध्ये २५८ जणांचा मृत्यू, तर जुलैमध्ये हल्ल्यांशी संबंधित २६८ मृत्यूची नोंद झाली.