नवी दिल्ली,
Property dealer beaten to death in Kalkaji दिल्लीतील पॉश कालकाजी परिसरात मालमत्ता व्यावसायिक बंटी घडियाल यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. कुटुंबीयांनी बंटी यांची काही जणांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्यात आले आहे. दक्षिण-पूर्व दिल्लीतील कालकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एल-८ परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बंटी यांचा रात्री त्याच इमारतीत राहणाऱ्या काही लोकांशी वाद झाला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत ते इमारतीवरून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून बंटी यांना काही जणांनी एकत्रितपणे मारहाण केल्याचा दावा केला आहे.

बंटी यांच्या बहिणीने सांगितले की, रात्री त्यांचा भाऊ काही जणांकडून मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यावेळी अनेक जण बंटी यांना मारहाण करत होते आणि त्यात एका महिलेचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. बंटी यांना वाचवण्याचा प्रयत्न करूनही संबंधितांनी ऐकले नाही. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून पोलिसांना फोन करूनही घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणात राजेंद्र उर्फ रज्जी चौधरी याचे नाव घेतले असून त्याने बंटी यांना मारहाण केल्याचा आणि इतरांकडूनही मारहाण करवून घेतल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे.