sbi massive recruitment drive देशातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अनुभवी व्यावसायिकांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत स्टेट बँक इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप, कोलकाता येथे डीन, प्राध्यापक आणि विपणन कार्यकारी अशा तीन पदांवर प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून, पदानुसार वार्षिक ५२ लाख ते ९८ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, उमेदवारांना ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

डीन पदासाठी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय ४० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी एमबीए, एक्झिक्युटिव्ह एमबीए, पीजीडीएम, पीजीडीबीए किंवा समकक्ष मान्यताप्राप्त पात्रतेमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. पीएचडी किंवा एमफिल पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. संबंधित उमेदवाराकडे किमान १५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे असून, त्यापैकी वरिष्ठ शैक्षणिक किंवा नेतृत्वाच्या पदावर किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी वार्षिक ९८ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देण्यात येणार आहे.
प्राध्यापक पदासाठी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण आणि शिकवण्याचा किंवा प्रशिक्षणाचा किमान ६ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी वार्षिक ६३ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. तर विपणन कार्यकारी पदासाठी विपणन विषयातील एमबीए किंवा संबंधित पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण आणि किमान ५ वर्षांचा विपणन क्षेत्रातील अनुभव मागण्यात आला आहे. डिजिटल विपणन, विपणन विश्लेषण आणि समाजमाध्यम विपणनाचे कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळू शकते. या पदासाठी वार्षिक ५२ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. प्राप्त अर्जांमधून पात्रता आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाईल. त्यानंतर मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल. डीन आणि प्राध्यापक पदासाठी मुलाखतीसोबत प्रात्यक्षिक सत्रही घेतले जाणार आहे, तर विपणन कार्यकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. त्यानंतर उमेदवाराची पात्रता आणि अनुभव लक्षात घेऊन वेतन पॅकेजबाबत चर्चा केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील करिअर विभागातून संबंधित जाहिरात पाहून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या सर्व अटी तपासणे आवश्यक आहे.