स्कूलबस खोल ओढ्यात कोसळली

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
पुणे 
school bus accident वडगाव रासई-कुरुळी मार्गावरील धोकादायक वळणावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस रस्त्यालगतच्या खोल ओढ्यात कोसळल्याची घटना शनिवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने बस ओढ्यावरील लोखंडी कठड्यात अडकल्याने ती उलटली नाही. त्यामुळे बसमधील सुमारे १० ते १५ विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला आणि मोठा अनर्थ टळला.
 

school bus accident in nhavare: bus falls into deep drain, 10 to 15 students rescued safely 
न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस असून, एमएच ४३ एच १७८५ असा तिचा क्रमांक आहे. ही बस दररोज वडगाव रासई, कुरुळी आणि आंधळगाव परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन न्हावरे येथील शाळेत येते. शनिवारी सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर सुमारे साडेअकराच्या सुमारास विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडे सोडण्यासाठी बस न्हावरेहून वडगाव रासईच्या दिशेने निघाली होती.
कुरुळी गाव ओलांडल्यानंतर बस एका धोकादायक वळणावर आली असता स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. काही क्षणांतच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल ओढ्यात कोसळली. मात्र, ओढ्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यात बस अडकल्याने ती उलटली नाही. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचता आले.
अपघातानंतर बसमधील विद्यार्थी घाबरून गेले. विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकून कुरुळी येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रयत्न करून बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पालकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, वडगाव रासई-कुरुळी मार्गावरील या धोकादायक वळणावर यापूर्वीही अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसलाच येथे अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या धोकादायक वळणावर आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.