शेफाली वर्माचा धडाका! ४९ चेंडूंत शतक!

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Shafali Verma's century off 49 balls भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने बांगलादेशविरुद्धच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडाकेबाज शतक झळकावत विक्रमांची मालिकाच रचली. शेफालीने अवघ्या ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यामुळे महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक करण्याच्या विक्रमाशी तिने बरोबरी साधली. या खेळीत तिने १०० धावा करताना ३ चौकार आणि तब्बल ९ षटकारांची आतषबाजी केली. तिचा स्ट्राईक रेट २०४.०८ इतका होता. या शतकासह शेफालीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज होण्याचा मान मिळवला. तिच्या नावावर आता १०२ षटकार झाले असून स्मृती मंधाना १०० षटकारांसह तिच्या मागे आहे. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारी शेफाली भारताची तिसरी महिला फलंदाज ठरली आहे. यापूर्वी स्मृती मंधानाने दोन वेळा, तर हरमनप्रीत कौरने एकदा शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, ४९ चेंडूंत शतक करून शेफालीने हरमनप्रीतच्या भारतासाठी सर्वात वेगवान टी-२० शतकाच्या विक्रमाशीही बरोबरी केली.
 

Shafali Verma 
 
 
२०२६ हे वर्ष शेफालीसाठी विक्रमांनी भरलेले ठरले आहे. यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर ८१५ धावा जमा झाल्या आहेत. त्यामुळे एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम स्मृती मंधानाच्या नावावर होता. मंधानाने २०२४ मध्ये ७६३ धावा केल्या होत्या. याच वर्षात शेफालीने ३५ षटकार ठोकले असून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० षटकार मारण्याचा विक्रमही तिने केला. यापूर्वी श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूने २०२४ मध्ये ३२ षटकार मारले होते. एका वर्षात सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी करण्याच्या विक्रमातही शेफालीने मजल मारली असून तिच्या आणि स्मृती मंधानाच्या नावावर प्रत्येकी आठ अशा खेळी आहेत.