कोस्टल रोडवर BMWचा चेंदामेंदा; तिघांचा दुर्दैवी अंत

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Three die on Coastal Road मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. मरीन ड्राइव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाणारी गुजरात पासिंगची BMW कार लोटस जेट्टीजवळ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कठड्याला धडकली आणि सुमारे ४० ते ५० फूट खाली कोसळली. पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. प्राथमिक तपासात कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.लाला लजपतराय महाविद्यालयासमोरील लोटस जेट्टीजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव BMW आधी रेलिंगला धडकली आणि त्यानंतर लाईटचा खांब व फलक तोडून पुलावरून खाली कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शानय गज्जल (२१), धिर्या सेठ (१७) आणि २५ वर्षीय अनोळखी तरुणाला मृत घोषित करण्यात आले. तर २० वर्षीय तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
 

Three die on Coastal Road 
 
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार सिल्वासाची असून कारमधील तरुण अहमदाबाद, गुजरात येथील असल्याचे समोर आले आहे. हे तरुण मुंबईत शिक्षणासाठी वास्तव्यास होते. मृतांपैकी एक जण आर्किटेक्चरचे, तर दुसरा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आदित्य ओस्वाल या तरुणाची प्रकृतीही गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ताडदेव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून घटनास्थळी पंचनामा आणि न्यायवैद्यक तपास सुरू आहे. अपघाताच्या नेमक्या कारणासह कारमधील व्यक्तींनी मद्यपान केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.