कॅम्प डेव्हिडचा दौरा रद्द करत ट्रम्प परतले

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump returned after cancelling tour अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याच्या अखेरीस कॅम्प डेव्हिड येथे जाण्याचा नियोजित दौरा एक दिवस आधीच रद्द करत शनिवारी संध्याकाळी अचानक वॉशिंग्टन डी.सी.मध्ये पुनरागमन केले. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रम्प ‘मरीन वन’मधून उतरताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या नियोजित वेळेआधी परतण्यामागचे नेमके कारण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. ते रविवारपर्यंत कॅम्प डेव्हिड येथे राहणार होते.
 
 

trump 
 
ट्रम्प यांच्या या अचानक परतीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत नव्या सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. या भागात असलेल्या अमेरिकन नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा तसेच संभाव्य प्रवासातील अडथळ्यांसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने खबरदारी वाढवल्याचे दिसून येत आहे.
 
 
दरम्यान, सौदी अरेबियाने शनिवारी पुष्टी केली की येमेनमधील हौथी बंडखोरांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या माध्यमातून सौदीची राजधानी रियाधला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हौथी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी रियाध तसेच यान्बू येथील तेल कंपनी अरामकोच्या सुविधांना लक्ष्य करण्यासाठी अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरल्याचा दावा केला आहे. सौदी अरेबियासोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणसमर्थित हौथी बंडखोरांकडून रियाधला लक्ष्य करण्याची ही ताजी घटना ठरली आहे.