भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग..संशयास्पद अन्नसाठा जप्त

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
नाशिक
tukaram mundhe अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि खाद्यतेलाच्या मागणीत वाढ होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तुकाराम मुंढे तसेच नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
 

tukaram mundhe food adulteration action, tukaram mundhe latest news, maharashtra food adulteration raid, nashik food and drug administration raid, 
या मोहिमेदरम्यान गेल्या दहा दिवसांत नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे या चार जिल्ह्यांत एकूण ३६ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये तब्बल ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक मोठी कारवाई अहिल्यानगरमध्ये करण्यात आली.
अहिल्यानगर येथील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर करण्यात आलेल्या कारवाईत ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे तब्बल ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटर जप्त करण्यात आले. या साठ्याच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नाशिकमध्येही प्रशासनाच्या पथकांनी मोठी कारवाई केली. ११ सप्टेंबर रोजी पहाटे द्वारका सर्कल परिसरात दोन खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. यावेळी परवानगीशिवाय वाहतूक केला जात असलेला सुमारे ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा २ हजार १५५ किलो बर्फीचा साठा आढळून आला. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या शीतगृहावरही कारवाई करण्यात आली. तेथून सीताफळ आणि आंब्याचा गर तसेच क्रीमचा एकूण ६ हजार ४५७ किलो साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ३९ लाख १८ हजार रुपये आहे.
जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतही तपासणी मोहीम राबविण्यात आली. पाचोरा येथील ‘न्यू वाघ मिल्क डेअरी’मधून ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे तूप आणि क्रीम जप्त करण्यात आले. धुळे शहरातील साक्री रोडवरील गायत्री ट्रेडर्समधून गायीचे आणि म्हशीचे संशयास्पद तूप जप्त करण्यात आले असून, या साठ्याची किंमत सुमारे ३ लाख १ हजार रुपये आहे.
नाशिक शहरातील रविवार कारंजा आणि पंचवटी परिसरातील विजया एंटरप्रायजेस आणि प्रकाश एंटरप्रायजेसवरही कारवाई करण्यात आली. या ठिकाणांहून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे वनस्पती तूप आणि सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. अहिल्यानगरमधील सावेडी येथील रुचीराज स्वीट्समधून २ लाख २२ हजार रुपये किमतीचे तूप, तर श्रीरामपूर येथून २ लाख रुपये किमतीचे गायीचे तूप जप्त करण्यात आले.
जळगावच्या इच्छादेवी चौकातून १ लाख ६६ हजार रुपये किमतीची अनधिकृत चंदन स्वीट सुपारी जप्त करण्यात आली. संगमनेर येथून सुमारे १ लाख रुपये किमतीचे पामोलीन तेल जप्त करण्यात आले, तर चोपडा येथे हलवा आणि बर्फीचा संशयास्पद साठा आढळून आला. नाशिक शहरातही गूळ, वेलची आणि तुपाचे संशयास्पद साठे आढळल्याने ते जप्त करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अथवा संशयास्पद अन्नपदार्थांची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.