कारंजा लाड,
Ambulance service suspendedउपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड येथे उपलब्ध असलेली १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका केवळ चालकाअभावी अनेक दिवसापासून रुग्णसेवेपासून दूर असल्याची बाब रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्याम सवाई व संतोष घोंगडे यांच्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आली. रुग्णांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ही रुग्णवाहिका तातडीने कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र चालक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, वाशीम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आपत्कालीन आरोग्यसेवेत वेळ हीच अनेकदा रुग्णासाठी जीवनरेषा ठरते. अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण, गर्भवती महिला तसेच पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात संदर्भित होणार्या रुग्णांना वेळेत वाहतूक सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या मालकीची आणि रुग्णसेवेसाठी उपलब्ध असलेली रुग्णवाहिका चालकाअभावी उभी राहणे ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सवाई व घोंगडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात दोन रुग्णवाहिका नियमितपणे कार्यरत असून त्यांच्यासाठी दोन चालक उपलब्ध आहेत. मात्र, तिसरी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध असूनही चालकाअभावी तिचा अपेक्षित उपयोग होत नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या दोन रुग्णवाहिका व त्यांच्या चालकांच्या व्यवस्थेत कोणताही बदल न करता तिसर्या १०२ रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र चालक तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपलब्ध साधन रुग्णाच्या सेवेत आले, तरच त्याचा खरा अर्थ’रुग्णालयात उपलब्ध असलेली प्रत्येक सुविधा ही केवळ यंत्रणा किंवा शासकीय मालमत्ता नसून ती गरजू रुग्णाच्या जीवनाशी जोडलेली सार्वजनिक आरोग्यसेवेची जबाबदारी आहे. त्यामुळे उपलब्ध रुग्णवाहिका निष्क्रिय न ठेवता तिचा पूर्ण क्षमतेने रुग्णसेवेसाठी वापर होणे आवश्यक आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणार्या प्रत्येक रुग्णाच्या वेळेची किंमत आहे. उपलब्ध रुग्णवाहिका चालकाअभावी उभी राहू नये, गरजेच्या क्षणी ती रुग्णाच्या मदतीला धावून जावी, हीच रुग्ण कल्याण समितीची भूमिका आहे. असे सवाई व घोंगडे यांनी स्पष्ट केले.
..................