अमीषा पटेलचा कलाकारांच्या एन्टॉरेजवर सवाल

म्हणाली, ‘निर्मात्यांचा पैसा खर्च न होताही लवाजमा सोबत ठेवा!’

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मुंबई
ameesha patel बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधताना अमीषाने चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान कलाकारांसोबत असणाऱ्या मोठ्या वैयक्तिक टीमच्या खर्चाबाबत भाष्य केले. विशेषतः काही अभिनेत्रींवर अप्रत्यक्षपणे टिप्पणी करताना त्या आपल्या स्टारडमचा अंदाज वास्तवापेक्षा मोठा लावत असल्याचे तिने म्हटले आहे.
 

ameesha patel on bollywood entourage costs: actress questions stars 
अमीषाने रविवारी ‘Ask Me Anything’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठ्या संख्येने वैयक्तिक टीम सोबत घेऊन जातात आणि त्याचा खर्च निर्मात्यांकडून केला जातो, हे योग्य आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर अमीषाने कोणताही आडपडदा न ठेवता आपले मत व्यक्त केले.
अमीषाने म्हटले की, अनेक अभिनेत्री आपल्याला मिळालेल्या स्टारडमची वास्तविकता स्वीकारण्यास तयार नसतात. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या मोठ्या टीमचा खर्च निर्मात्यांना करावा लागतो आणि काही वेळा हा खर्च चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षाही अधिक असल्याचे तिने नमूद केले. निर्मात्यांचा पैसा खर्च न करता या अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातही एवढाच मोठा लवाजमा सोबत ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त करत अमीषाने आपल्या पोस्टमध्ये हसण्याचे इमोजीही वापरले.चित्रपटसृष्टीत एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री प्रमोशनसाठी बाहेर पडताना त्यांच्या टीममध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फॅशन स्टायलिस्ट, मॅनेजर यांच्यासह इतर कर्मचारी असू शकतात. कलाकारांच्या कामाचे स्वरूप आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील उपस्थिती लक्षात घेता अशा टीमची आवश्यकता असू शकते. मात्र, या अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च नेमका कोणाच्या जबाबदारीत यायला हवा, हा मुद्दा अमीषाच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाचे बजेट ठरवताना निर्मात्यांनी कलाकारांच्या एन्टॉरेजवर होणाऱ्या खर्चाचाही विचार करायला हवा, असे तिच्या भूमिकेतून स्पष्ट होते.याच संवादादरम्यान अमीषाने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही भूमिका स्पष्ट केली. कमी किमतीच्या तिकिटांवर किंवा मोठ्या ऑफर्सच्या माध्यमातून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये सातत्याने काम करण्यापेक्षा काही वर्षांनी एखादा मोठा आणि लक्षवेधी चित्रपट करण्याला आपले प्राधान्य असल्याचे तिने सांगितले.
अमीषा पटेलला ‘गदर 2’ या चित्रपटातून पुन्हा मोठे यश मिळाले होते. सनी देओलसोबतच्या या चित्रपटात तिने सकीनाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2024 मध्ये ती ‘तौबा तेरा जलवा’ या चित्रपटात झळकली. मात्र, त्यानंतर तिच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. कलाकारांच्या वैयक्तिक टीमवरील खर्चाबाबत अमीषाने केलेल्या या वक्तव्यामुळे आता बॉलिवूडमधील एन्टॉरेज कल्चरवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.