सुचिका तरियालची ऐतिहासिक कामगिरी

MMAमध्ये भारताला पहिले पदक

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |

नवी दिल्ली

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शिरपेचात आणखी एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये (MMA) भारताला स्पर्धेतील पहिले पदक मिळवून देण्याचा मान ३६ वर्षीय सुचिका तरियालने मिळवला. महिलांच्या ६० किलो वजनी गटात तिने कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय लिहिला.
 

MMAमध्ये भारताला पहिले पदक 

सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत सुचिकाचा सामना सिंगापूरच्या तेओ हुई हून हिच्याशी झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. सुचिकाने अखेरपर्यंत झुंज देत सामना ओव्हरटाइमपर्यंत नेला. मात्र, पंचांचा निर्णय सिंगापूरच्या खेळाडूच्या बाजूने लागल्याने सुचिकाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

निकाल जाहीर होताच सुचिका भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि अंतिम फेरीत प्रवेश करता न आल्याची निराशा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. उपांत्य फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंना अधिकृत पदक समारंभासाठी पोडियमवर बोलावण्यात आले. मात्र, निकालामुळे निराश झालेल्या सुचिकाने सुरुवातीला पोडियमवर जाण्यास नकार दिला. भारतीय प्रशिक्षकांनी तिची समजूत काढल्यानंतर ती पोडियमवर पोहोचली. त्यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू होते. भारतासाठी ऐतिहासिक पदक जिंकल्याचा आनंद आणि अंतिम फेरी गाठता न आल्याची खंत, या दोन्ही भावना तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी दिसत होत्या.

सुचिकाने याआधी रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या अल्तांचिमेग बायगलमाचा २-० असा पराभव केला होता. या विजयासह तिने भारताचे MMAमधील पदक निश्चित केले होते. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या २०२६च्या आवृत्तीत मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर BMX, टेकबॉल, पॅडेल, सर्फिंग आणि व्हर्च्युअल तायक्वांदो या क्रीडा प्रकारांचाही यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच समावेश झाला आहे.

सुचिकाचा MMAमधील प्रवासही तितकाच उल्लेखनीय आहे. तिने २०१७ मध्ये या क्रीडा प्रकारात पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास सात वर्षे ती MMAपासून दूर राहिली. या कालावधीत तिने ज्युडो आणि जिऊ-जित्सू या क्रीडा प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले.

२०२४ मध्ये सुचिकाने ब्रेव्ह कॉम्बॅट फेडरेशनसोबत करार केला. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये बहरीन येथे झालेल्या BRAVE CF 92 स्पर्धेतून तिने व्यावसायिक MMAमध्ये पुनरागमन केले. प्रदीर्घ कालावधीतील मेहनत, पुनरागमन आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर सुचिकाने आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर भारतासाठी MMAमधील पहिले ऐतिहासिक पदक मिळवले आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पदकतालिकेत आणखी एका रौप्यपदकाची भर पडली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले आहे. त्यामुळे स्पर्धेत भारताच्या पदकसंख्येत आणखी वाढ झाली आहे.