मंगरुळनाथ,
bus Service Suspendedगेल्या १५ वर्षांपासून अविरत सुरू असलेली नागपूर— संभाजीनगर मार्गे शेलूबाजार बससेवा बंद करण्यात आल्याने शेलूबाजारसह पेडगाव, तराळा आणि मार्गावरील गावांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, नोकरदारांची ये-जा, व्यापार्यांचा व्यवसाय, महिलांचा प्रवास, ज्येष्ठ नागरिकांची कामे तसेच वैद्यकीय व शासकीय कामासाठी या बससेवेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना आता पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दीड दशकापासून सुरू असलेली ही महत्त्वाची बससेवा बंद का करण्यात आली, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत असून,ती तातडीने पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.

नागपूर गणेशपेठ आगारामार्फत धावणारी ही बससेवा परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा आधार होती. गेल्या १५ वर्षांत या मार्गावरील असंख्य प्रवाशांनी नागपूर, संभाजीनगर तसेच मार्गावरील विविध शहरांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शासकीय कामे आणि उपचारांसाठी या बससेवेचा नियमित वापर केला. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही केवळ प्रवासाची सुविधा नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले महत्त्वाचे साधन आहे. अशा परिस्थितीत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली बससेवा बंद झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे गणितच बिघडले आहे. बससेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांना खासगी वाहनांसह उपलब्ध असलेल्या मर्यादित पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच अतिरिक्त आर्थिक खर्चही सहन करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणार्या नागरिकांची यामुळे अधिकच गैरसोय होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीची सुविधा कमी करण्याऐवजी ती अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. शेलूबाजारसह पेडगाव आणि तर्हाळा या मार्गावरील महत्त्वाची प्रवासी ठिकाणे असून, या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे नागपूर—संभाजीनगर मार्गे शेलूबाजार बससेवा पूर्ववत करताना पेडगाव व तर्हाळा येथे नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे. बससेवा सुरू झाली तरी या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा नसेल तर परिसरातील मोठ्या संख्येने प्रवाशांना त्याचा अपेक्षित लाभ मिळणार नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेली बससेवा ही परिसरातील नागरिकांच्या प्रवासाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन परिवहन विभागाने विलंब न करता ही सेवा पूर्ववत सुरू करावी. तसेच पेडगाव व तर्हाळा येथे नियमित थांबा देऊन शेलूबाजार परिसरातील नागरिकांना नागपूर व संभाजीनगरकडे जाण्या-येण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.