बनावट देशी दारूच्या पेट्या जप्त

- गुन्हे शाखेची कारवाई : गडचिरोलीमध्ये नेण्यात येत होती दारु

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
liquor seized दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूच्या पेट्या नेण्याचा प्रयत्न करणार्‍या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातून १५ लाख ६० हजाराच्या दारूच्या पेट्या जप्त केल्या. तपासणीअंती या पेट्यांमध्ये असलेली दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अब्दुल तौसिफ अब्दुल हफिज (३४) गवळीपुरा, आझादनगर असे या आरोपीचे नाव आहे.
 
 
 liquor seized
 
 
अमरावती येथून एका ट्रकमध्ये दारूच्या पेट्या भरून आल्लापल्ली (जि. गडचिरोली) येथे नेण्यात येत आहेत अशी माहिती वाहनचोरी विरोधी पथकाचे अंमलदार अजय शुक्ला यांना मिळाली होती. 
दारूने भरलेला ट्रक रात्रीच्या वेळी नागपूरमार्गे जाणार असल्याचे देखील समजले होते. या माहितीवरून पोलिसांनी आठवा मैल परिसरातील आठवडी बाजारात सापळा रचला. रात्री २.३० च्या सुमारास एमएच ४० सीडी १५९१ क्रमांकाचा ट्रक घटनास्थळाहून जात असताना पोलिसांनी ट्रक अडविला. त्यात भंगार भरल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता भंगारच्या खाली देशी दारूच्या पेट्या मिळून आल्या.
 
पोलिसांनी तौसिफची विचारपूस केली असता पाहिजे आरोपी अंकुश उर्फ अन्ना सुधाकर कुंचूनवार (३८) हिंगणघाट (जि. वर्धा) याच्या सांगण्यावरून धुळे येथून हा माल भरल्याचे त्याने सांगितले. प्रवरा डिस्टीलरी येथे रॉकेट नावाची ही दारू तयार केल्याचे दिसून आले. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बालाजी चाळणेवार यांना देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी दारूची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे दिसून आले. पोलिसांनी देशी दारूच्या ३९० पेट्या, ट्रक, मोबाईल आणि भंगार असा २८ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.liquor seized याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तौसिफला अटक केली. ही कारवाई एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिलीप चंदन, रोशन तिवारी, विलास कोकाटे, सचिन बढीये, अजय शुक्ला, नितीन वर्मा, राहुल कुसरामे, अभय ढोणे यांनी केली.