३९ वर्षीय कर्णधाराने प्रथमच संघाला बनवले CPL चॅम्पियन

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cpl-champian-2026कॅरेबियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये अँटिग्वा आणि बार्बुडा फाल्कन्सने प्रथमच चॅम्पियन बनत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात ३९ वर्षीय मोईन अलीच्या नेतृत्वाखालील या संघाने जमैका किंग्समेनचा एकतर्फी सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जमैका संघाने माज सदाकतच्या शानदार शतकाच्या जोरावर १७१ धावा केल्या. मात्र, अँटिग्वाच्या गोलंदाज सुफियान मोकिमने ४ बळी घेत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर १७२ धावांचे लक्ष्य अँटिग्वा आणि बार्बुडा फाल्कन्सने अवघ्या १६.४ षटकांत २ गडी गमावून सहज गाठत शानदार विजय मिळवला.
 
champ
 
CPLच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. जमैका किंग्सचा फलंदाज माज सदाकतने अवघ्या ५८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ११४ धावांची शतकी खेळी केली. यासह CPLच्या इतिहासातील अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याच्या या शानदार खेळीनंतरही संघातील इतर फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. संघातील ७ खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, तर २ खेळाडू खाते न उघडताच नाबाद राहिले. माज सदाकतनंतर जमैका संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सॅम अयूब होता. त्याने २२ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करताना १ बळीही घेतला.
 
 
अँटिग्वा आणि बार्बुडा फाल्कन्सकडून पाकिस्तानी गोलंदाज सुफियान मोकिमने उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या ४ षटकांत केवळ १४ धावा देत ४ बळी घेतले. त्यानंतर १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या फाल्कन्ससाठी आणखी एक पाकिस्तानी फलंदाज हसन नवाजने शानदार फलंदाजी केली. त्याने ३५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४७ धावा केल्या. अमिर जंगूसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची मॅच-विनिंग भागीदारी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. शानदार गोलंदाजीसाठी सुफियान मोकिमला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.