एनसीसी छात्र सैनिकांच्या पथनाट्यातून नशामुक्तीचा संदेश

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
देवळी, 
de-addictionविकसित भारताचे स्वप्न साकारायचे असेल तर नशामुक्त युवा समाज घडविणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात सुमारे ६५ टक्के युवा लोकसंख्या असून, योग्य दिशा, प्रशिक्षण आणि जबाबदारी दिल्यास ही युवा शक्ती भारताला जगातील सर्वच क्षेत्रांत प्रगत राष्ट्र बनविण्याची क्षमता बाळगते. मात्र, तरुणाईला नशेच्या विळख्यात जाण्यापासून रोखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, वर्धाचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल आर. के. सामनंदा यांनी केले.
 
nasha
 
 
नागपूर एनसीसी ग्रुप अंतर्गत सुरू असलेल्या ६३ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा सभागृहात नशामुक्त भारत अभियानांतर्गत आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात ते एनसीसी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करत होते. प्रमुख अतिथी म्हणून सुबेदार मेजर दिलबाग सिंग, एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, नायब सुबेदार संजय कुमार आणि हवालदार अश्विन कुमार उपस्थित होते.
 
यावेळी स्थानिक २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने एस.एस.एन.जे. महाविद्यालय, देवळी येथील एनसीसी छात्र सैनिकांनी नशामुक्त युवा  विकसित भारत या विषयावर प्रभावी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला उपस्थित एनसीसी छात्र सैनिक, सैनिकी प्रशिक्षक व एनसीसी अधिकार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पथनाट्यातून सिगारेट, बिडी, तंबाखू, खरा, गुटखा, चरस, गांजा, उत्तेजक इंजेक्शन्स तसेच विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवन कशा प्रकारे उद्ध्वस्त होते, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले.
 
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या पथनाट्याची संकल्पना व दिग्दर्शन एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. सुमारे १२ मिनिटांचे जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यानंतर उपस्थित ४५० एनसीसी छात्र सैनिक, सैनिकी प्रशिक्षक आणि एनसीसी अधिकार्यांना नशामुक्त भारत अभियानाची शपथ देण्यात आली.