दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई; चिमुकल्या लेकीचे घरी आगमन

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मुंबई
deepika padukone अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. दीपिका पदुकोणने आज, 19 सप्टेंबर रोजी, दुसऱ्या मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे, याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी दीपिका पती रणवीर सिंग आणि सासरच्या मंडळींसह सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले.
 
 
दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई; चिमुकल्या लेकीचे घरी आगमन  deepika padukone and ranveer singh welcome second baby girl on september 19, 2026
दीपिका आणि रणवीर यांना यापूर्वी 8 सप्टेंबर 2024 रोजी पहिली मुलगी झाली होती. त्यांनी तिचे नाव ‘दुआ’ असे ठेवले आहे. दिवाळी 2025च्या निमित्ताने या दाम्पत्याने त्यांच्या लेकीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यानंतर 19 एप्रिल रोजी दीपिकाने आपल्या दुसऱ्या गर्भधारणेची अधिकृत घोषणा केली होती. या वेळी तिने ‘दुआ’च्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट असल्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यासोबत ‘नजर न लागो’ असा भाव व्यक्त करणारे इमोजीही तिने वापरले होते.
आता दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर दीपिकाने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदवार्ता दिली आहे. तिच्या पोस्टमध्ये नवजात मुलीच्या पावलांचे ठसे दिसत असून त्यावर “स्वागत आहे, चिमुकली… 19/09/2026,” असा संदेश लिहिलेला आहे. या पोस्टनंतर दीपिका आणि रणवीर यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीपिकाच्या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. श्रेया घोषाल, कृती खरबंदा, धनश्री आणि सारा अर्जुन यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्सच्या माध्यमातून दाम्पत्याचे अभिनंदन केले. राधा अष्टमीच्या शुभ दिवशी दीपिकाच्या घरी मुलीचा जन्म झाल्याने अनेक युजर्सनीही आनंद व्यक्त केला असून हार्ट इमोजीच्या माध्यमातून दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.