‘डीजे’चे नियम तोडल्यास शंभर टक्के कारवाई

मोबाईल अ‍ॅपवरून तपासणार डेसिबल, पोलिस अधीक्षक नोपानी यांची ग्वाही

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर
dj rules मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता चंद्रपूरातदेखील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘साउंड लेव्हल मिटर’ या विशेष तांत्रिक मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करून ‘डिजे’च्या आवाजाची अचूक पातळी (डेसिबल) मोजणार आहोत. निर्बंध घालून दिल्याप्रमाणे 2 बेस आणि 2 टॉप या आवाजाच्या साहित्याव्यतिरिक्त आवाजाची उच्च तांत्रिक उपकरणे आढळल्यास किंवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या ‘बीएनएस’ कलमानुसार शंभर टक्के गुन्हे दाखल करू , अशी ग्वाही पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी ‘तभा’ला दिली.

dj rules
आतापर्यंत चंद्रपूर शहरात डीजेच्या आवाजाचे निर्बंध तोडणार्‍या 4 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यालयाच्या आदेशानुसार, वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शांतता क्षेत्रात दिवसा 50 व रात्री 40 डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा 55, रात्री 45, तर व्यापारी क्षेत्र 65 आणि 45 तसेच मोठ्या औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 तर रात्री 70 डेसिबल अशी आवाजाची मर्यादा आहे.
 
चंद्रपुरातील गेणेशोत्सवाला मागील वर्षी गालबोट लागले होते. यंदाची मिरवणूक मात्र शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडवी अशी नागरिकांची ईच्छार आहे. त्यासाठी नागरिकांनी डीजेच्या आवाजावरील निर्बंधालाही पाठींबा दिला असून, त्यांनी केलेल्या तक्रारींमुळेच जिल्ह्यात यंदा नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणार्‍यांवर कारवाई शक्य होत आहे. 112 या डीजे संबंधी तक्रार क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवल्यास पोलिस तात्काळ गुन्हा दाखल करीत आहेत. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचेही मत नोपानी यांनी व्यक्त केले.
अ‍ॅप वरून कशी होणार तपासणी?
पोलिस अधिकारी हे मिरवणुकीच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मोबाईलमधील अधिकृत साउंड डिटेक्टर किंवा डेसिबल मिटर अ‍ॅप सुरू करतील. हे अ‍ॅप मायक्रोफोनच्या मदतीने प्रत्यक्ष वेळेतील आजूबाजूच्या आवाजाची कमाल आणि सरासरी पातळी मोजून त्याचा आलेख स्क्रिनवर दाखवेल. जर हा आवाज कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे.