dna-of-water शास्त्रज्ञांनी एका अत्यंत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याच्या थेंबात किंवा टेस्ट ट्यूबमध्ये जटिल गणितीय गणना अर्थात आकडेमोड करू शकणारा डीएनए कॉम्प्युटर तयार केला आहे. यामुळे पाण्याचा डीएनए शोधणे शक्य होणार आहे. जगात विविध भागांतील पाणी वेगवेगळे असून, पाण्याची तपासणी करताच ते पाणी कोणत्या भागातील आहे, याची माहिती मिळणार आहे. आयर्लंडच्या मेनूथ विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली.

डीएनए प्रणालीने १० वेगवेगळ्या अणू-रेणूंचे निरीक्षण केले. यामुळे भविष्यात शरीराच्या पेशींचा बारकाईने अभ्यास करणे शक्य होणार आहे. प्रयोगांमध्ये या प्रणालीच्या मदतीने ७०० हून अधिक गणना करण्यात आल्या. बेरीज, तीनने गुणाकार, दोनने भागाकार तसेच आठ-बिट पॅरिटी डिटेक्शन यांसारख्या गणनांचा त्यात समावेश होता. मात्र, मोठ्या गणनांना बराच वेळ लागला असून, सुमारे १.१ कोटी ते ३.४ कोटींच्या श्रेणीतील एका गणनेला तब्बल १४ तास लागले.