शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करू नका

पालकमंत्र्यांनी स्वीकारली १ हजारावर निवेदने,‘जनसंवाद" कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
अमरावती
chandrashekhar-bawankule शेती व अन्य कामांसाठी रेती, माती वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करू नये, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांनी आठवड्यात दुपारी ३ ते ५ दरम्यान वेळ निश्चित करून अभ्यागतांना भेटा व त्यांचे प्रश्न सोडवा, अशा सूचना देत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, सोमवारी जनसंवाद कार्यक्रमात जवळपास १ हजारांहून अधिक निवेदने स्वीकारली.
 
bavankule
नियोजन भवनात हा जनसंवाद झाला. तरुण, तरुणींपासून महिला, पुरुष, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींनी यावेळी मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या सर्व नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी करून संबंधित विभागाकडून वेळेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला. जमीन मोजणी, जमिनीचा ताबा मिळूनही मालकी हक्क मिळालेला नाही. मुख्य रस्त्याशेजारील नाले दुरुस्ती, योजनेचा लाभ अशा विविध विषयांवर यावेळी निवेदने देण्यात आलीत. ही सर्व निवेदने संबंधित विभागाकडून तातडीने निकाली काढणार असल्याचा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी दिला.
 
बैठकीला येताना नियोजन भवनासमोर उपस्थित दिव्यांग व्यक्तींची आस्थेने चौकशी करून त्यांचे प्रश्न समजून घेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला. जनसंवादला आमदार प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रताप अडसड, प्रवीण पोटे, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते.