अमरावती
amravati-ravi-rana गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमरावती महानगरपालिका व संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आमदार रवी राणा यांनी सोमवार, २१ सप्टेंबरला प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. शहरातील प्रमुख विसर्जनस्थळ असलेल्या छत्री तलाव तसेच दस्तुरनगर चौक परिसराला भेट देऊन त्यांनी विसर्जनाच्या नियोजनाची माहिती घेतली.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक विसर्जनस्थळी येत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीची यावेळी पाहणी करण्यात आली. विसर्जनस्थळी आवश्यक असलेल्या विविध सुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. सहायक आयुक्त नितीन बोबडे यांनी आमदार रवी राणा यांना माहिती दिली. विसर्जनस्थळी करण्यात येणारी स्वच्छता व्यवस्था, आरोग्य विभागाची तयारी, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, अग्निशमन विभागाची सज्जता तसेच प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये करण्यात आलेला समन्वय याबाबत माहिती देण्यात आली.
पाहणीदरम्यान महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेता नाना आमले, झोन सभापती इस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव, शिक्षण समिती सभापती प्रीती रेवणे, नगरसेवक व नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, सहायक आयुक्त नितीन बोबडे, भूषण पुसतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, उद्यान अधीक्षक शैलेश बोरकर, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटबागे, उपअभियंता शरद तिनखेडे, अजय विंचुरकर, राजेश आगरकर तसेच पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.