ओनी.
Gold mine collapses again in Sudan सूडानमध्ये सुरू असलेल्या भीषण गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेने मोठी जीवितहानी झाली आहे. देशाच्या ईशान्य भागातील लाल समुद्र राज्यातील ओनी या दुर्गम परिसरात सोन्याच्या खाणीची बोगदा कोसळून किमान ११ खाण कामगारांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, एका आठवड्यात खाण दुर्घटनेची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी पश्चिम सूडानमध्ये खाण कोसळून ८२ जणांचा मृत्यू झाला होता.

ओनी परिसरातील ही दुर्घटना शनिवारच्या रात्री सुरू झाल्याची माहिती स्थानिक कर्मचारी अब्दलहाय खारिफ अबाकर यांनी दिली. रविवारीपर्यंत घटनास्थळावरून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर ३० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. सूडानी मिनरल रिसोर्सेज कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेही या घटनेची माहिती दिली. मात्र, माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसल्याने त्यांनी आपली ओळख उघड न करण्याची अट ठेवली. कंपनीने दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केले असून मृत आणि जखमींच्या संख्येबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.
सूडान हा सोन्याचा प्रमुख उत्पादक देश असून तेथे हजारो लहान आणि अनौपचारिक खाणी सुरू आहेत. या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पुरेसे पालन होत नसल्याने खाण दुर्घटना वारंवार घडत असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी पश्चिम भागातील सोन्याच्या खाणीच्या अनेक बोगद्यांमध्ये कोसळल्याने किमान ८२ जणांचा मृत्यू झाला होता. हा परिसर निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या नियंत्रणाखाली आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या खाणीवरून झालेल्या वादात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ७० हून अधिक जणांची हत्या केल्याचेही समोर आले होते.