रोजगारासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण
गोंदिया,
gondia maoist rehabilitation हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवाद्यांच्या पुनर्वसनाला गोंदिया जिल्हा पोलिस दलाने गती दिली आहे. याचाच एक भाग म्हणून सेवा संकल्प अभियानांतर्गत १५ आत्मसमर्पित माओवाद्यांना विविध शासकीय कागदपत्रांचे वितरण करण्यात आले असून, स्वावलंबी जीवनासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या माओवाद्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेची माहिती माओवादी संघटनांपर्यंत पोहोचविण्याचे काम गोंदिया जिल्हा पोलिस दलाकडून सातत्याने सुरू आहे. या प्रयत्नांना प्रतिसाद देत गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी एमएमसी प्रवक्ता तसेच एसझेडसी अनंत ऊर्फ विकास नागपुरे यांच्यासह दर्रेकसा दलममधील १४ माओवाद्यांनी जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या एका माओवाद्यासह १५ जणांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच या आत्मसमर्पित माओवाद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शेळीपालन, मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, बांबू क्राफ्टिंग आणि डिजिटल मोबाईल अवेअरनेस आदी प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
या कागदपत्रांचे वाटप...
आत्मसमर्पित माओवाद्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा करीता आवश्यक कागदपत्रांची गरज असून अभियानांतर्गत बँक खाते, मतदार ओळखपत्र, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि विवाह प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तयार करण्यात आली असून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती...
येथील जिल्हा नियोजन सभागृहात १७ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मंदार पात्की, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, निवासी जिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील आदी उपस्थित होते.