गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतून दगडफेक

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
जळगाव
jalgaon raver ganpati visarjan clash घरगुती गणपती विसर्जनादरम्यान रस्ता अडवल्याच्या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे रविवारी सायंकाळी दोन गटांत वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 

jalgaon raver ganpati visarjan clash jan clash: a dispute over road blocking escalated into stone pelting between stone pelting, 3 injured, police deployed 
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणी रावेर पोलिसांनी दंगल, दगडफेक तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी रावेर येथे पोहोचून घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. सध्या परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून, घटनेमागील नेमकी कारणे आणि वादाला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तपास केला जात आहे.
दरम्यान, गणपती विसर्जनाच्या वेळी वाद निर्माण होण्याची ही एकमेव घटना नसून, यापूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या साहिबाबादमध्येही विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली होती. त्या घटनेत गणपती स्थापनेपासून सुरू असलेल्या डीजे वाजवण्याच्या वादाने विसर्जनाच्या वेळी पुन्हा उग्र रूप धारण केले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये मारामारी झाली होती आणि काही जण जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता.
गणपती विसर्जनासारख्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी किरकोळ कारणांवरून वाद वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. रावेरमधील ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवरही पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.