अबब...संपूर्ण गाव खरेदी केले जगातील एकमेव अभिनेता

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मुंबई
johnny depp's हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर फ्रान्समधील त्याच्या खासगी मालमत्तेमुळे त्याची चर्चा होत आहे. जॉनी डेपने 2001 मध्ये फ्रान्समधील सेंट ट्रोपेजजवळ तब्बल 30 एकरांवर पसरलेले एक संपूर्ण गाव खरेदी केले होते. प्रोव्हेन्सल शैलीतील या ठिकाणी जुन्या इमारती, निवासस्थाने, उद्याने आणि अनेक आलिशान सुविधा आहेत. त्यामुळे डेपची ही मालमत्ता सामान्य घर किंवा फार्महाऊस न राहता एका स्वतंत्र प्रकल्पासारखीच विकसित झाली आहे.
 

johnny depp 
सेंट ट्रोपेजपासून सुमारे 17 मैल अंतरावर असलेल्या या गावासाठी डेपने 55 दशलक्ष अमेरिकन डॉलर मोजल्याचे एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. गाव खरेदी केल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी त्याने आणखी सुमारे 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले. जुन्या इमारतींना नवा लूक देताना त्यांचे ऐतिहासिक स्वरूप आणि आकर्षण कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या संपूर्ण मालमत्तेच्या सजावटीत डेपची वैयक्तिक आवड दिसून येते. विशेष म्हणजे, गावाच्या नूतनीकरणासाठी त्याने मोठ्या डिझायनरची मदत घेतली नाही, तर अनेक इमारती स्वतःच्या पसंतीनुसार सजवल्या. द्राक्षांच्या बागा, हिरवीगार उद्याने आणि जुन्या दगडी वास्तू यामुळे या ठिकाणाला वेगळेच रूप मिळाले आहे. डेपने त्याची तत्कालीन पत्नी वैनेसा पॅराडिस आणि मुलं लिली-रोज व जॅक यांच्यासोबत या ठिकाणी अनेक वर्षे घालवली आहेत. हॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर शांत वातावरणात कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने या जागेची निवड केली होती.
 
 
एका दशकापूर्वी ‘पीपल’ मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत डेपने फ्रान्समधील या आयुष्याचे वर्णन जवळपास स्वर्गासारखे केले होते. वैनेसा आणि मुलांसोबत दक्षिण फ्रान्समधील छोट्या गावात राहण्याचा अनुभव त्याला विशेष आवडत असल्याचे त्याने सांगितले होते. 30 एकरांच्या या संपत्तीवर त्याचा दिनक्रम फारसा धावपळीचा नसून बागकाम करणे आणि फुलं उमलताना पाहणे यातच तो आनंद शोधत असल्याचे त्याने त्या वेळी नमूद केले होते.
 
 
 
डेपच्या या मालमत्तेत राहण्यासाठी सुमारे 1000 चौरस मीटर जागा आहे. मुख्य घर तब्बल 4500 चौरस फुटांपेक्षा मोठे असून त्याशिवाय सहा गेस्ट कॉटेज आहेत. संपूर्ण मालमत्तेत सुमारे 15 बेडरूम आणि 14 बाथरूम असल्याचे सांगितले जाते. पाहुण्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यासोबतच येथे ‘कॅफे मार्चेलिन’ नावाचे बिस्ट्रोही आहे. दोन स्विमिंग पूल, आकर्षक बगीचे आणि ऑलिव्हची उद्याने या ठिकाणच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहेत.
याशिवाय या मालमत्तेत कलाकारांसाठी स्वतंत्र स्टुडिओ, शिकाऱ्याची केबिन आणि कर्मचाऱ्यांसाठी घराचीही व्यवस्था आहे. डेपने त्याचा मुलगा जॅक याच्यासाठी स्केट पार्कही तयार केले आहे. ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या लोकप्रिय चित्रपट मालिकेपासून प्रेरित वाइन सेलरही या ठिकाणी असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, डेपने एकेकाळी ही मालमत्ता विकण्याचाही प्रयत्न केला होता. वैनेसा पॅराडिससोबत विभक्त झाल्यानंतर 2015 मध्ये हे गाव सुमारे 25 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, त्यासाठी अपेक्षित खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर 2021 मध्ये या मालमत्तेची किंमत पुन्हा 55 दशलक्ष अमेरिकन डॉलर ठेवून ती विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आली.जून 2024 मध्ये समोर आलेल्या वृत्तांनुसार, डेपने अखेर हे गाव विकण्याचा विचार बाजूला ठेवला आणि त्याच्या देखभाल व डागडुजीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकेकाळी विक्रीसाठी चर्चेत आलेली ही 30 एकरांची मालमत्ता आता जॉनी डेपच्या खासगी आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणूनच पाहिली जाते.