भंडारा,
kiran-purandare-ranangunphi-schoolशाळा भरली होती.... विविध पक्षी अन प्राण्यांचे आवाज ऐकू यायला लागले! वर्ग खोल्यांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कुतूहालाचा विषय होता. पण पटांगणात बसलेले विद्यार्थी या अनुभवाचे साक्षीदार होत होते... निसर्गप्रेमी, पक्षीमित्र किरण पुरंदरे यांच्या "राननगुंफी" कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा परिसरात निसर्ग अवतरला होता आणि या निसर्गरम्य वातावरणात शाळेच्या विद्यार्थिनी निसर्गाशी एकरूप झाल्याचे चित्र होते.
निसर्गप्रेमी, पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांचा सहवास म्हणजे निसर्गाशी नाते जोडू पाहणाऱ्या, पशुपक्ष्यांशी प्रेम असलेल्या प्रत्येकासाठी पर्वणी असते. स्थानिक नूतन कन्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी शाळा प्रशासन, वाईल्ड वॉच फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही पर्वणी चालून आली. किरण पुरंदरे यांनी शाळेत येत वर्ग 11 आणि 12 वीच्या विद्यार्थिनींसाठी रानगुंफी हा कार्यक्रम सादर केला.
निसर्गाची ओळख, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती, पक्षी आणि प्राण्यांचे आवाज काढून दाखवीत त्यांनी विद्यार्थिनींना जणूकाही नागझिराच्या अरण्याची सफर करावी. विद्यार्थिनींशी साधलेला मुक्त संवाद, यातून विद्यार्थिनींच्या मनातील असलेल्या विविध शंकांचे झालेले निरसन, एवढेच नाही तर पर्यावरणाप्रती आपले असलेले देणे अशा विविध विषयांना स्पर्श करीत एक तासाच्या संवादातून त्यांनी निसर्ग आपला कसा सखा होऊ शकतो, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. हुबेहूब काढलेले पक्षी आणि प्राण्यांचे आवाज अद्भुत असे होते. ज्या विद्यार्थिनी प्रत्यक्ष हा अनुभव घेत होत्या, त्यांना नक्कीच अभयारण्याची सैर घडली असावी. मात्र ज्या प्रत्यक्ष किरण पुरंदरे यांच्या कार्यक्रमाचा अनुभव घेऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थिनींनाही जंगलात जाण्याचा मोह आवरला नसावा हे तेवढेच खरे...
एका तासाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने निसर्गाशी मैत्रिचा एक मार्ग विद्यार्थिनींना दाखविला. पर्यावरण संवर्धनाची शपथ यावेळी किरण पुरंदरे यांनीठावर शाळेच्या निलू तिडके, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, वाईल वॉच फाउंडेशनचे सचिव शैलेंद्र राजपूत, डॉ. विनोद देशमुख, नदीम खान उपस्थित होते.