विविध योजनांसाठी कुंभारबांधवांना मिळणार ओळखपत्र

शोभाताई फडणवीस यांच्या मागणीला जिल्हाधिकार्‍यांचा प्रतिसाद

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर,
kumbhar community id cardकुंभार बांधव परंपरेनुसार मातीची भांडी, मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांना निशुल्क माती मिळावी. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांना अधिकृत ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार शोभाताई फडणवीस यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली. त्यास प्रतिसाद देत, लवकरच जिल्ह्यातील पात्र कुंभारबांधवांना ओळखपत्र देण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.
 

kumhbh 
याबाबत पत्रकारांना माहिती देताना शोभाताई फडणवीस यांनी, 21 जानेवारी 2011 च्या परिपत्रकाचा दाखला दिला. या शासन निर्णयानुसार, पारंपारिक व्यवसाय करणार्‍या कुंभार समाजाच्या कुटुंबास सवलती मिळण्याच्या अनुषंगाने ओळखपत्र दिले जावे. तहसिलदारांच्या किंवा नायब तहसिलदारांच्या लेखी पूर्वपरवानगीने व कोणतीही शुल्क किंवा स्वामीत्वधन न देता, कोणत्याही पीढीजात कुंभाराच्या कुटुंबास विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यास नदी किंवा नाल्याच्या पात्रातून तसेच अभिहस्तांकित न केलेल्या कोणत्याही खाजगी जमिनीतून किंवा सरकारी पडीक जमिनीतून वर्षाला 700 ब्रासपर्यंतच्या मर्यादेत माती काढता येईल.
 
 
पोंभुर्णा व मूल तालुक्यातील जवळपास 25 ते 30 कुंभार बांधवांना घेऊन शोभाताई फडणवीस यांनी जिल्हाधिकारी पंत यांची सोमवारी भेट घेतली. लवकरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सदर शासन निर्णयाप्रमाणे ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.