मुंबई
mahesh manjrekar मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांच्या कॅन्सरच्या उपचारांबाबत त्यांचे पती, अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आहे. सध्या महेश मांजरेकर त्यांच्या आगामी ‘बंडखोर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मेधा यांच्या आजारपणाचा काळ, उपचार आणि या कठीण परिस्थितीत कुटुंबाने घेतलेली भूमिका याबद्दल माहिती दिली.
‘बंडखोर’मध्ये मेधा मांजरेकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होत्या. मात्र, याच काळात त्यांना कॅन्सरचे निदान झाले. उपचार सुरू झाल्यानंतर त्यांचे केस गळू लागले तसेच केमोथेरपीसह इतर उपचारही सुरू होते. त्यामुळे त्यांना चित्रपटातील भूमिका साकारणे शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली.
मेधा यांच्या आजारपणाच्या काळाबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी कॅन्सरकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही स्पष्ट केला. त्यांच्या मते, सध्या वैद्यकीय क्षेत्रात कॅन्सरच्या उपचारांसाठी विविध औषधे आणि उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे आजाराचे निदान झाल्यानंतर घाबरून जाण्याऐवजी उपचारांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. स्वतःला यापूर्वी कॅन्सरचा सामना करावा लागल्याने आपला अनुभव मेधा यांच्यासाठी आधार ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
महेश मांजरेकर यांनी या काळातील कुटुंबाचा दृष्टिकोन सांगताना कॅन्सरला घाबरून न जाण्याची भूमिका मांडली. “आम्ही कॅन्सरला घाबरत नाही. माझं एक लॉजिक आहे, की मी मला कॅन्सर झाला असं कधी म्हणत नाही,” असे ते म्हणाले. कॅन्सरचे निदान लहान वयातील व्यक्तींनाही होऊ शकते आणि आज त्यावरील उपचारांसाठी अनेक औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या अनुभवाकडे पाहताना आपण कॅन्सरमधून बरे झालेल्या लोकांमध्ये स्वतःला गणत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महेश यांच्या आजारपणाचा अनुभव मेधा यांनी जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यांना स्वतः कॅन्सरचे निदान झाल्यानंतर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी मिळाली होती, असे महेश यांनी सांगितले. दोघांनीही या संकटाकडे तुलनेने शांतपणे पाहिले. कुटुंबीयांनीही त्यांना सहानुभूतीचे वातावरण देण्याऐवजी सकारात्मक आणि सामान्य वातावरण देण्याचा प्रयत्न केला. मेधा मांजरेकर यांनीही काही काळापूर्वी सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टमधून आपल्या उपचारांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली होती. कॅन्सरचे निदान झाल्यापासून शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनपर्यंतच्या उपचारांदरम्यान कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या प्रेमाचा आणि आधाराचा त्यांनी उल्लेख केला होता. या संपूर्ण काळात मिळालेल्या पाठिंब्यामुळे उपचारांचा प्रवास सुसह्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.