मंगरूळनाथ शहर स्वच्छतेला ‘घंटागाडी’चा वेग!

नगरपरिषदेचा विशेष उपक्रम

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
mangrulnath city cleanlinessशहरातील स्वच्छतेला अधिक वेग देत घरोघरी निर्माण होणारा घनकचरा थेट संकलित करण्यासाठी मंगरूळनाथ नगरपरिषदेने १ सप्टेंबरपासून प्रभागनिहाय घंटागाडी सेवा सुरू केली आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दिवसातून दोन वेळा घंटागाड्या घराघरांत पोहोचणार असल्याने रस्ते, चौक आणि मोकळ्या जागावर पडणार्‍या कचर्‍याला आळा घालण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.
 
mangrul
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगरपरिषदेची नसून नागरिकांचाही त्यात तितकाच सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे घरातील घनकचरा घंटागाडीमध्येच द्यावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि स्वच्छता कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या संकल्पनेतून शहरातील नियमित साफसफाई, घनकचरा संकलन आणि प्रभागनिहाय स्वच्छता व्यवस्थेला अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
नगरपरिषदेचे नगरसेवक, सभापती आणि आरोग्य विभागातील कर्मचारी या स्वच्छता उपक्रमात सक्रियपणे सहभागी राहणार आहेत. घंटागाडी नियमितपणे घरापर्यंत पोहोचत असताना नागरिकांनीही कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये न टाकता निर्धारित पद्धतीने सुपूर्द केल्यास शहराच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची मोहीम न राहता ती नागरिकांची सामूहिक चळवळ व्हावी, यासाठी सहकार्याची गरज आहे. आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतल्यास शहराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप देणे शय होईल. नगरपरिषदेची घंटागाडी घरापर्यंत आली आहे, आता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे.