मिरजमध्ये मोठी दुर्घटना, सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला, 6 जण अडकले

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मिरज

miraj civil hospital मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. रुग्णालयाच्या आवाराबाहेर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचा स्लॅब अचानक कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, 7 ते 8 कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 

miraj civil hospital entrance slab collapses, two dead and several workers injured 
शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्याचे काम सुरू होते. कमानीसाठी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळला. काही क्षणांतच बांधकामाचा मोठा भाग कोसळल्याने त्याखाली काम करणारे अनेक कामगार अडकले. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 ते 6 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. जखमी कामगारांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने कोसळलेला स्लॅब आणि बांधकामाचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांसह रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्यावर लक्ष ठेवले जात आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत अधिकृत तपासानंतरच माहिती स्पष्ट होणार आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि जखमींना उपचार देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.