मुंबई
mithu mukherjee death मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिथू मुखर्जी यांचे निधन झाले. गेल्या वर्षभरापासून त्या कर्करोगावर उपचार घेत होत्या. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात रविवारी रात्री वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि खास व्यक्तिमत्त्वाने ठसा उमटवणाऱ्या मिथू मुखर्जी यांना चाहत्यांकडून ‘टॉलिवूडची रेखा’ म्हणूनही संबोधले जात होते.
मिथू मुखर्जी या प्रामुख्याने बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या अभिनयातील सहजता, मोठे डोळे, प्रभावी देहबोली आणि चंचल स्वभाव यामुळे त्या अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. बंगाली चित्रपटांमध्ये त्यांनी ‘चुलबुली’ नायिकेची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मात्र, कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी रुपेरी पडद्यापासून स्वतःला दूर केले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टी आणि प्रसिद्धीच्या झोतापासून लांब होत्या. त्या मुंबईत वास्तव्यास होत्या.
१९७० ते १९९० या कालावधीत मिथू मुखर्जी यांनी अभिनय क्षेत्रात काम केले. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी १९७३ मध्ये दिनेन गुप्ता दिग्दर्शित ‘मर्जीना अब्दुल्ला’ या चित्रपटाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. या चित्रपटात त्यांनी अलीबाबाच्या दासी मर्जीनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्यांच्या कारकीर्दीला वेग आला आणि त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
यानंतर ‘निशिकन्या’ या चित्रपटातूनही त्यांनी आपली अभिनयक्षमता दाखवली. ‘मौचॅक’ या चित्रपटाने त्यांची लोकप्रियता आणखी वाढवली. त्यानंतर रणजित मल्लिक यांच्यासोबत त्यांनी ‘स्वयंसीद्धा’मध्ये काम केले. या चित्रपटातील मिथू मुखर्जी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. ‘आश्रिता’मधील त्यांची भूमिकाही बंगाली प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.
बंगाली चित्रपटांबरोबरच मिथू मुखर्जी यांनी हिंदी आणि ओडिया चित्रपटांमध्येही अभिनय केला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ‘खान दोस्त’मध्ये काम केले. या चित्रपटात अभिनेते राज कपूर यांचीही महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर ‘सफेद झूठ’, ‘दिल्लगी’ आणि ‘दो लडके दोनो कडके’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्या झळकल्या.आपल्या सहज अभिनयशैलीमुळे आणि लक्षवेधी व्यक्तिमत्त्वामुळे मिथू मुखर्जी यांनी बंगाली सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, दीर्घकाळ चित्रपटांपासून दूर राहिल्याने त्यांच्या शेवटच्या काळातील आयुष्याविषयी फारशी माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नव्हती. गेल्या वर्षभरापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर रविवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीतील एका लक्षवेधी अभिनेत्रीचा अध्याय संपला आहे.