भंडारा,
News about a farmer from Bhandara रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्रावर विकले. मे 2025 मध्ये विकलेल्या धानाचे चुकारे अद्याप मिळाले नाही. पैसे नसल्याने आई-वडिलांच्या उपचाराला विलंब झाला आणि एकाच दिवशी दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. आई-वडील गमावलेल्या या शेतकऱ्याने आज चक्क जिल्हा पणन अधिकारी कार्यालय गाठून जिल्हा पणन अधिकाऱ्यांना 14 वी ची पत्रिका दिली. कार्यालयाच्या दिरंगाई च्या कारभाराचा निषेध व्यक्त करीत कार्यालयातच अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आई-वडिलांना श्रद्धांजली वाहिली. वरवर दिसायला हे आंदोलन असले तरी, पैशामुळे उपचाराभावी आई वडील गमावलेल्या एका शेतकऱ्याच्या वेदनांचा पाढाच तिथे वाचला गेला. राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यापोटी देय असलेली संपूर्ण रक्कम प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पणन कार्यालयाला वळती केली आहे. कार्यालयाकडून जिल्ह्यातील केंद्रांना ही रक्कम देणे अपेक्षित आहे. मात्र काही केंद्र वादग्रस्त म्हणून अशा केंद्रांची रक्कम थांबवून ठेवली जाते. विशेष म्हणजे यापैकी काही केंद्र देवाण-घेवाण करून आपले काम काढून घेतात. यात अधिकाऱ्यांचे साठे लोटे दिसून येते. मात्र काही केंद्रांवरील शेतकऱ्यांना अजूनही चुकाराचे पैसे मिळाले नाही.
भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील प्रशांत खोब्रागडे, आई इंदिराबाई आणि कुटुंबातील अन्य एकाच्या नावाने तिड्डी येथील केंद्रावर धान विक्री करण्यात आली होती. मे 2025 मध्ये धानाची विक्री केली. ऑगस्ट महिन्यात धानाची नोंद होऊन खरेदी झाल्याची पावती आली. तेव्हापासून शेतकरी पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. या केंद्रावर 90 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी धान विक्री केली. मात्र यापैकी कुणाचेही पैसे आजपर्यंत दिले गेले नाहीत. वारंवार जिल्हा पणन अधिकार्यांची भेट घेऊन पैशाची मागणी केली परंतु प्रत्येक वेळी टाळण्यात आले. अशातच प्रशांत खोब्रागडे यांच्या आई वडिलांना उपचाराची गरज असताना पैसे अभावी ते वेळेत उपचार देऊ शकले नाहीत. 15 सप्टेंबर रोजी दोघांचाही एक तासाच्या अंतराने मृत्यू झाला. दुःख अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारे होते.
आई-वडिलांचा पैशांअभावी आलेला मृत्यू प्रशांत यांना चटका लावून गेला. एवढं होऊनही खात्यात पैसे मिळाल्याने संतापलेल्या प्रशांत खोब्रागडे आणि अन्य शेतकऱ्यांनी अखेर आज वेगळ्या पद्धतीने पणन अधिकारी कार्यालयाच्या दिरंगाई कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना आई-वडिलांच्या 14 वी ची पत्रिका देण्यात आली. तुमच्यामुळे आई वडील गमावले, असं म्हणत शेतकऱ्यांनी त्याच मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली. यऊपरही पैसे दिले जाणार नसतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शेवटचे आंदोलन करू असा इशारा यावे देण्यात आला. स्वतः प्रशांत खोब्रागडे, जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद बांते यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शासन सकारात्मक असताना, शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे एका शेतकऱ्याला अशा पद्धतीने आंदोलन करावे लागत असेल, तर त्या शेतकऱ्याच्या आयुष्यातील यापेक्षा दुसरा दुर्दैवी क्षण कोणता? आज सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत आहे, तरीही अधिकाऱ्यांची अशी वृत्ती शासनाला बदनाम करून सोडते हे तेवढेच खरे!