काबुल,
Pakistan Afghanistan airstrikeपाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. सोमवारी ईशान्य अफगाणिस्तानात पाकिस्तानने केलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांमध्ये किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला अधिकृतपणे दुजोरा दिला असून, जवळपास तीन महिन्यांच्या शांततेनंतर घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही शेजारी देशांमधील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत.
तालिबानचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर माहिती दिली की, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी कुनार प्रांतातील एका रहिवासी घराला लक्ष्य केले. या भीषण हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यातही दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले. या हल्ल्यात एक दुकान आणि एक रिकामे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, सुदैवाने तिथे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणावर पाकिस्तानी लष्कराकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
या ताज्या हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. या संघर्षामुळे सीमेवरील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.