पासपोर्टच्या नियमांत बदल

नव्या पासपोर्टसह तत्काळ सेवेसाठीही वाढले शुल्क

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मुंबई
passport rules changed पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पासपोर्टच्या शुल्क आणि काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने नवीन पासपोर्ट काढणे, पासपोर्टचे नूतनीकरण करणे, हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट बदलून घेणे तसेच तत्काळ पासपोर्टसाठी आता अधिक शुल्क मोजावे लागणार आहे. याशिवाय १५ वर्षांखालील मुलांच्या पासपोर्टच्या वैधतेबाबतही बदल करण्यात आला आहे.
 

passport rules, passport fees, passport fee hike, new passport rules, passport renewal, tatkal passport, passport replacement, child passport, passport validity, passport application, 36 page passport, 60 page passport, passport charges, passport latest news, india passport, travel news 
प्रौढ अर्जदारांसाठी नियमित पासपोर्ट सेवेच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ३६ पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी १,५०० रुपये शुल्क आकारले जात होते. आता याच पासपोर्टसाठी २,५०० रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच या सेवेसाठी एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. ६० पानांच्या पासपोर्टसाठी पूर्वी २,००० रुपये शुल्क होते; आता त्यासाठी ३,५०० रुपये मोजावे लागतील.
तत्काळ पासपोर्ट सेवेसाठीही अर्जदारांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. ३६ पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी आधी ३,५०० रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यात १,५०० रुपयांची वाढ होऊन हे शुल्क ५,००० रुपये करण्यात आले आहे. तर ६० पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी पूर्वी ४,००० रुपये शुल्क होते. त्यात २,००० रुपयांची वाढ झाल्याने आता ६,००० रुपये द्यावे लागतील.
हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट बदलून घेण्यासाठीही अधिक शुल्क आकारले जाणार आहे. ६० पानांच्या पासपोर्टच्या रिप्लेसमेंटसाठी यापूर्वी ५,५०० रुपये शुल्क होते. आता यासाठी ८,५०० रुपये खर्च येणार आहे.
दरम्यान, १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पासपोर्ट शुल्कातही बदल करण्यात आला आहे. अशा मुलांसाठी ३६ पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी आधी १,००० रुपये शुल्क आकारले जात होते. आता हे शुल्क १,७५० रुपये असेल. तत्काळ पासपोर्टसाठी ३,००० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
मुलांच्या पासपोर्टच्या वैधतेच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जारी करण्यात येणारा ३६ पानांचा सामान्य पासपोर्ट आता पाच वर्षे किंवा संबंधित मूल १८ वर्षांचे होईपर्यंत वैध राहील. यापैकी जी मुदत आधी पूर्ण होईल, ती वैधता ग्राह्य धरली जाणार आहे.
याशिवाय आठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित श्रेणी, सेवा आणि लागू शुल्काची माहिती तपासणे अर्जदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.