मुंबई
maithili thakur अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात. आता भोजपुरी गायिका आणि खासदार मैथिली ठाकूर यांच्या समर्थनार्थ केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मैथिली ठाकूर नुकत्याच मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्या तब्बल 13 कोटी रुपयांच्या आलिशान रॉल्स-रॉईस कारमधून उतरल्या. त्यांचा हा व्हिडीओ आणि आलिशान कार पाहिल्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी त्यांच्यावर टीका केली. या ट्रोलिंगला कंगना राणौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रत्युत्तर दिले.
कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये नेत्यांचे चांगले राहणीमान पाहून काही लोकांना जळफळाट होत असल्याचे म्हटले आहे. एका तरुण खासदाराला केवळ ती आलिशान आयुष्य जगत असल्यामुळे ट्रोल केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजसेवेसाठी काम करत असतानाही लोकप्रतिनिधींना स्वतःचे करिअर आणि लोकप्रियता असू शकते, असा मुद्दा कंगना यांनी मांडला.आपल्या भूमिकेचा विस्तार करत कंगना यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधी निस्वार्थपणे काम करत असले तरी त्यांनी चांगले किंवा आलिशान आयुष्य जगण्यात गैर काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला. इतरांच्या संपत्तीमध्ये आपल्याला रस नसला तरी लोकप्रतिनिधींनी कायम गरिबांसारखेच जीवन जगले पाहिजे, अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर मैथिली ठाकूर यांच्या समर्थनार्थ कंगना यांनी घेतलेली भूमिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, कंगना राणौत यांनी यापूर्वीही एका अभिनेत्रीच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट केली होती. तृषा कृष्णन यांचे नाव थेट न घेता त्यांनी तमिळनाडूमधील एका वादग्रस्त प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट केली होती. संबंधित प्रकरणात दोन पक्षांमधील संबंधांशी संबंधित मुद्दा असल्याचा उल्लेख करताना कंगना यांनी शाब्दिक गैरवर्तन आणि चारित्र्यहननाच्या प्रसंगी महिलेलाच लक्ष्य केले जात असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे कंगना यांची ही भूमिका देखील त्यावेळी चर्चेत आली होती.