अल्लीपूर,
rise-in-accidentsशिरसगाव ते अल्लीपूर मार्गावर पवनी गावाजवळ अनेक दिवसांपासून मोठा जीवघेणा खड्डा पडलेला आहे. यामुळे मार्गावर अनेक अपघात घडले असून संबंधित विभागाने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकर्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या खड्ड्यामुळे गेल्या ७ दिवसात ५ अपघात झाले असून ८ ते ९ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतापजनक सवाल करण्यात येत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व नागरिक ये-जा करतात. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
येत्या दोन-तीन दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्यास शिवराया संघटनेच्या वतीने सा. बां. विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.